

Visapur Ashram School : आदिवासी वसतिगृह आणि आश्रमशाळांमधील असुविधांवरून राज्यात आंदोलनांची तीव्रता वाढलेली असतानाच नाशिक जिल्ह्यातील विसापूर शासकीय आश्रमशाळेतील इयत्ता दुसरीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
श्रुती ओंकार सूर्यवंशी या विद्यार्थिनीच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, संतप्त पालक आणि आदिवासी युवकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्यानंतर प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करत तीन कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले.
कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत विसापूर शासकीय आश्रमशाळा येते. श्रुतीला शाळेत असताना ताप आल्याने प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर तिला मोकभगणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारानंतर प्रकृती सुधारल्याने ती पुन्हा शाळेत (School) आली. मात्र, त्याच रात्री तिची प्रकृती पुन्हा खालावली आणि तिचा मृत्यू झाला.
श्रुतीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिकच्या (Nashik) जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पालक आणि आदिवासी युवक मोठ्या संख्येने रुग्णालयात दाखल झाले. श्रुतीच्या मृत्यूस कारणीभूत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करत कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका पालकांनी घेतली. मृतदेह थेट आदिवासी आयुक्तालयात नेण्याची तयारीही व्यक्त करण्यात आली.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात जाऊन पालकांची भेट घेतली आणि त्यांची समजूत काढली. तरीही पालकांच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनाने तातडीने कारवाई केली. शिक्षण विस्तार अधिकारी भगवान निकम, स्त्री अधीक्षका स्मिता प्रल्हाद गायकवाड आणि आश्रमशाळेचे मुख्याध्यापक जिभाऊ पवार यांना निलंबनाचे आदेश अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांनी काढले.
दरम्यान, श्रुतीच्या कुटुंबीयांना शासनातर्फे पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. श्रुतीने सेंट्रल किचनमधून पुरवठा करण्यात आलेले भोजन घेतल्यानंतर तिची प्रकृती बिघडल्याचा आरोप रुग्णालयात उपस्थित पालकांनी केला आहे. त्यामुळे सेंट्रल किचन तातडीने बंद करण्याची मागणीही करण्यात आली. मात्र, या आरोपाला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन आणि संबंधित तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे.
आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांनी श्रुतीचा मृत्यू शाळेत झाला की रुग्णालयात, यापेक्षा तिच्या मृत्यूमागील नेमके कारण शोधणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. सेंट्रल किचनची नोंदवही तपासण्यात येणार असून, श्रुतीला किती ताप होता, तिला कोणते उपचार देण्यात आले आणि तिच्या मृत्यूचे नेमके कारण काय आहे, याचा तपास केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सहाय्यक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कश्मिरा शंखे यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या भोजनाबाबत चौकशी करण्यात आल्याचे सांगितले. विसापूरसह एकूण 17 शाळांना केंद्रीय स्वयंपाकघरातून भोजनाचा पुरवठा केला जातो. संबंधित शाळेचे तसेच इतर शाळांचे रजिस्टर तपासण्यात आले असून, दूषित अन्न दिल्याचे कोणतेही पुरावे आढळले नसल्याचे प्रशासनाने सांगितले. शाळेतील पाण्याचे नमुनेही तपासण्यात आले आहेत. एखाद्या विद्यार्थ्याचा अशा प्रकारे मृत्यू झाल्यास आदिवासी विकास विभागाकडून दोन लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची तरतूद असल्याचेही कश्मिरा शंखे यांनी सांगितले.
श्रुतीच्या मृत्यूचे नेमके कारण सध्या तपासाचा विषय आहे. भोजनामुळेच तिचा मृत्यू झाला, असा आरोप पालकांकडून करण्यात आला असला तरी प्रशासनाच्या प्राथमिक तपासात दूषित अन्नाचे पुरावे आढळले नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे उत्तरीय तपासणी अहवाल, वैद्यकीय नोंदी, भोजनाचे नमुने आणि पाण्याच्या तपासणीचे निष्कर्ष या सर्व बाबी महत्त्वाच्या ठरणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.