नाशिक : सरकारच्या वाईनबाबतच्या धोरणावर टीका करताना बंडातात्या कराडकर यांनी राज्यातील राजकीय नेत्यांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून नवा वाद सुरू झाला आहे. राज्य महिला आयोगानंही याची गंभीर दखल घेतली आहे. राष्ट्रवादीकडून बंडातात्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. त्यांच्या विधानामुळे महिला संतप्त झाल्या आहेत.
राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिकच्या शहराध्यक्ष अनिता भामरे यांनी बंडातात्या कराडकरांबाबत (Bandatatya Karadkar) संताप व्यक्त केला आहे. ''बंडातात्या कराडकरांना महिलांचा सन्मान करता येत नसेल तर अपमान तरी करू नका. बंडातात्या कराडकर म्हणजे राज्य सरकारच्या विरोधात झपाटलेले तात्या विंचू आहेत,'' अशी संतप्त प्रतिक्रिया अनिता भामरे (Anita Bhamre) यांनी दिली आहे.
कराडकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबतही वादग्रस्त विधान केलं आहे. यावर भामरे म्हणाल्या, ''कुठलीही खातरजमा न करता केवळ सरकारच्या विरोधात आंदोलन करायचे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र बंडातात्यांना शोभत नाही.
''बंडातात्यांनी विठू माऊलीचे भक्त आहेत. त्यांनी समाजाला प्रवचनातून ज्ञान द्यावे विंचू सारखे विषारी वक्तव्य करू नये, अन्यथा महिलांचा अनादर केल्याने काय परिणाम होईल हे सांगता येत नाही तेव्हा दक्षता घ्या,'' असा इशारा भामरे यांनी दिला आहे.
शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी कराडकर यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. कराडकर स्वत:ला कीर्तनकार म्हणवतात आणि अशाप्रकारे स्त्रीत्वाचे धिंडवडे काढतात. हे खपवून घेतले जाणार नाही. त्यांनी जाहीररित्या माफी मागावी, अशी मागणी केली तर, खासदार नवनीत राणा यांनीही कराडकरांना सुनावले आहे. त्या म्हणाल्या की, आम्ही वाईनच्या विरोधात आहोत. या निर्णयावर महाराष्ट्रातील आम्ही सगळ्या महिला विरोधात आहोत. मात्र, कराडकरांचे महिलांबाबतचे हे वक्तव्य खपवून घेणार नाही, असा इशारा राणा यांनी दिला आहे. तसेच, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनीही बंडातात्यांनी माफी मागणी केली आहे.
राजकीय व्यक्तींबाबत केलेल्या बंडातात्यांनी केलेल्या विधानामुळे त्यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी माफी मागितली. त्यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात जमाव बंदी आदेश डावलून जमाव जमवून आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.