Ahmednagar News : "दुसऱ्याच्या झेंड्यावर आजकाल काही जण महिलांना पंढरपूर-शिर्डी असे देवदर्शन घडवून आणत आहेत. मात्र, यातून त्यांच्या पदरात काही पुण्य पडणार नसून मतदारही आकर्षित होणार नाहीत", असे म्हणत राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार नीलेश लंके यांनी नाव न घेता खासदार सुजय विखे पाटील यांना टोला लगावला.
राष्ट्रवादीतील फुटीअगोदर खासदार सुजय विखे यांच्याविरोधात लोकसभेसाठीचे संभाव्य उमेदवार म्हणून आमदार नीलेश लंके यांच्याकडे पाहिले जात होते. पण राष्ट्रवादीतील फुटीनंतर आमदार लंके अजितदादांच्या गटात सामील झाल्याने त्यांची लोकसभेच्या उमेदवारीबाबत अनिश्चितता असल्याचे बोलले जाते.
यातच आमदार लंके यांच्याकडून विखे पिता-पुत्रांवर धडाडणारी टीकेची तोफही थंडावल्याने दिसून आले. पण आता लंके यांनी नाव न घेता विखेंवर निशाणा साधल्यामुळे महायुतीमध्ये सर्व आलबेल नाही असेच दिसून येत आहे.
आमदार लंकेंच्या या वक्तव्याचे पडसाद उमटण्याची चिन्हं दिसून येत आहेत. खासदार सुजय विखे यांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील जवळपास पन्नास हजार महिलांना पंढरपूर-शिर्डी देवदर्शनाचा लाभ देण्यात आला. या अभियानाचा समारोप पंढरपूरमध्ये नुकताच झाला. तसेच या देवदर्शनाची चर्चाही झाली.
असाच देवदर्शनाचा उपक्रम आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्यावतीने गेल्या आठ वर्षांपासून राबवण्यात येत आहे. याचाच धागा पकडून पारनेर तालुक्यातील एका कार्यक्रमात आमदार लंके यांनी आज दुसऱ्याच्या झेंड्यावर काही जण महिलांना पंढरपूर-शिर्डी देवदर्शन घडवत असल्याचे सांगितले. परंतु त्यातून त्यांच्या पदरात पुण्य पडणार नाही आणि मतदारही आकर्षित होणार नाही, अशी टीका कुणाचेही नाव न घेता लंके यांनी केली.
आपण आठ वर्षांपूर्वी कोणतीही स्वार्थी भावना मनात न ठेवता सर्वसामान्य जनतेच्या ऋणातून उतराई होण्यासाठी महिला-पुरुषांना देवदर्शनाचा उपक्रम सुरू केला. आता काही जण 2024 ची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून महिलांना पंढरपूर-शिर्डी देवदर्शन घडवत आहेत. निवडणुकीनंतर ते तुम्हाला 'रामराम'ही करणार नाहीत, पण आम्ही सदैव तुमच्या सेवेला हजर असू, अशी पुष्टी आमदार लंके यांनी भाषणात केली.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.