राजेंद्र त्रिमुखे -
Ahmednagar : नगर जिल्ह्यातील पारनेर नगरपंचायतमध्ये शुक्रवारी(दि.23) मोठे राजकीय नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं. नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वात खाली राष्ट्रवादीची सत्ता आहे. पारनेर नगरपंचायतीत एकूण 19 सदस्यांपैकी 11 सदस्य हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आहेत.
या पार्श्वभूमीवर पूर्वी ठरल्याप्रमाणे सव्वा वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांनी राजीनामा देणं अपेक्षित असताना शुक्रवारी (दि.23 ) केवळ उपनगराध्यक्षा सुरेखा अर्जुन भालेकर यांनी राजीनामा दिला. मात्र, नगराध्यक्ष विजय औटी(Vijay Auti) यांनी राजीनामा वेळेत न दिल्यानं राजकीय वातावरण काहीसं गोंधळाचं चित्र निर्माण झालं होतं. त्यानंतर नगराध्यक्ष औटी यांनी आपला राजीनामा जिल्हाधिकारी यांच्याकडं देऊन त्याचबरोबर राष्ट्रवादीने आपल्या 11 नगरसेवकांची गट नोंदणी करून नगरपंचायतवरील आपला हक्क कायम ठेवला आहे. (Latest Marathi News)
यादरम्यान, नगरपंचायतीत असलेले भाजप(BJP) चे एकमेव नगरसेवक अशोक चेडे यांनीही आपण आमदार लंके यांच्या कामावर प्रेरित होऊन आपण राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचं जाहीर करत भाजपला मोठा धक्का दिला आहे. पारनेर तालुक्यातील आमदार लंके विरोधातील कार्यरत असलेल्या आणि विखेंचे समर्थक असलेल्या भाजप गटाला हा एक मोठा धक्का असल्याचे मानलं जातंय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके(Nilesh Lanke) यांचं पारनेर तालुक्यासह शहरावरही एकहाती वर्चस्व आहे . पारनेर नगरपंचायत मधील सत्तेची मोट बांधताना आणि निष्ठवंतांना न्याय देण्यासाठी आमदार लंके यांनी नियोजनबद्ध अनेक कार्यकर्त्यांना पदांसाठी शब्द दिलेला आहे. त्या अनुषंगाने या घडामोडी सुरू असल्याचं बोललं जात आहे.
सव्वा वर्षाचा कालावधी संपल्यानंतर नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांनी राजीनामा देणं ठरल्यानुसार अपेक्षित होतं. आणि त्यानुसार पत्रकार परिषद घेऊन या पदाधिकाऱ्यांनी आपण राजीनामा देणार असल्याचंही जाहीर केलं होतं. मात्र, उपनगराध्यक्ष सुरेखा भालेकर यांनी पारनेरमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सविता कुमावत यांच्याकडे राजीनामा दिला. पण त्याचवेळी नगराध्यक्ष विजय औटी यांनी राजीनामा न दिल्यानं पुढील राजकीय नाट्य पुढे आले.
मात्र, त्यानंतर काही वेळातच नगराध्यक्ष विजय औटी यांच्यासह सर्व नगर 11 नगरसेवकांनी अहमदनगरमध्ये जिल्हाधिकारी यांच्यापुढे जात 11 सदस्यांची गट नोंदी नोंदणी करतानाच नगराध्यक्ष विजय औटी यांनी आपला राजीनामाही थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करून एकूणच संपूर्ण दिवसभराच्या राजकीय नाट्यावर पडदा टाकला.
दिवसभराच्या या राजकीय नाट्यानंतर पारनेर नगरपंचायतीवर आमदार निलेश लंके यांचे एकहाती वर्चस्व असल्याचे पुढं आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे 11 नगरसेवक नगरपंचायतीत आहे तर महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेचे चार नगरसेवकसोबत आहेत. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचा एकमेव नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देताना दिसून आला.
एकूणच या घडामोडीवर संध्याकाळी नगरमध्ये असलेले खासदार सुजय विखे यांना याविषयी छेडले असतात, 'जे गेलेत त्यांना शुभेच्छा' एवढीच त्रोटक प्रतिक्रिया त्यांनी दिली.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.