Nashik political News : आमदार नितीन पवार यांनी आयुष्यात पहिल्यांदाच जाहीरपणे आपला वाढदिवस साजरा केला. या वेळी त्यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे बर्थडे गिफ्ट मागितले. कळवण-सुरगाणा मतदारसंघातील विकासकामांना मंजुरी द्यावी, हे माझ्यासाटी गिफ्ट असेल, असे नितीन पवार म्हणाले. याचे कौतुक करत अजितदादांनीही निधी देण्याचा पवारांना शब्द दिला. तसेच अजितदादांसह इतर मंत्र्यांनी पवारांच्या अनोख्या 'बर्थडे सेलिब्रेशन'ला दाद दिली. (Latest Political News)
नितीन पवार म्हणाले, 'आमचा मतदारसंघ आदिवासीबहुल आहे. येथील जिल्हा परिषद शाळांची वाईट अवस्था झाली आहे. शासन किंवा सीएसआरच्या माध्यमातून शाळांची दुरुस्ती करावी. नाशिक-दिंडोरी-कळवण रस्ता चौपदरी व्हावा, सिंहस्थ कुंभमेळ्यात चांगला होईल, सुरगाणा तालुक्यातील उंबरठाणला ग्रामीण रुग्णालय व्हावे, वसाका कारखाना सुरू करावा. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी क्रीडा प्रबोधिनी करावी, ओतूर धरणाचा प्रश्न, सुरगाणा तालुक्यात सिंचन प्रकल्पांना मंजुरी द्यावी. अर्जुनसागर परिसरात दिवंगत ए. टी. पवार यांच्या स्मारकास मंजुरी देऊन पर्यटन विकास करावा, भंगार बसेस बदलून नव्या गाड्या द्याव्यात,' आदी मागण्या पवारांनी वाढदिवसानिमित्त केल्या. तसेच अगदी सुरुवातीपासून अजितदादांसोबत असून शेवटपर्यंत राहणार असल्याचे सांगत नितीन पवार भावुक झाले. (Maharashtra Political News)
अजित पवारांनी (Ajit Pawar) नितीन पवारांच्या सर्व मागण्या मान्य करताना सप्तशृंगी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली. अजितदादा म्हणाले, सप्तशृंगी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत बैठक होणार आहे. आजच्या दिवशी शब्द देतो की, सोमवारी ८१ कोटी ८६ लाखांचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर झालेल्या तुम्हाला सगळ्यांना वाचायला मिळेल. बचत गट आणि अंगणवाडी सेविका यांच्याबाबत सरकार मोठा निर्णय घेणार आहे. नाशिक जिल्हा बँक अडचणीतून बाहेर काढायची आहे. त्यासाठी कठोर निर्णय घेण्यासही सरकार मागेपुढे पाहणार नाही, असेही अजित पवारांनी या वेळी स्पष्ट केले.
कळवण येथे शनिवारी ४९४ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी शेतकरी मेळावा आणि अभीष्टचिंतन सोहळा उपमुख्यमंत्री पवार यांच्या उस्थितीत पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अन्न व पुरवठामंत्री छगन भुजबळ होते. या वेळी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, हिरामण खोसकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, देविदास पिगळे, विष्णुपंत म्हैसधुणे, नगराध्यक्ष कौतिक पगार, रंजन ठाकरे, तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, शिवाजी महाराज स्मारकाचे अध्यक्ष भूषण पगार, नारायण हिरे आदी उपस्थित होते.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.