North Maharashtra: हातातोंडाशी आलेला घास हिरावला! उत्तर महाराष्ट्रात पिकांना तडाखा

Heavy rain lashes North Maharashtra:अनेक ठिकाणी जमीन खरवडून गेली आहे. नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांच्या पावसाने मालेगाव आणि नांदगाव तालुक्यातील शेतीपिकांना याचा तडाखा बसला.
 flood damage inspection
flood damage inspectionsarkarnama
Published on
Updated on

किरण कवडे / देविदास वाणी

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे व नंदूरबार या चारही जिल्ह्यांत यंदा अतिवृष्टीने मोठे नुकसान सोसावे लागणार आहे. जळगाव जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात ८१ हजारापेक्षा जास्त हेक्टर शेतीचे नुकसान झाले. यात ५४ हजार हेक्टरवरील कापूस पिकाचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी जमीन खरवडून गेली आहे.

नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांच्या पावसाने मालेगाव आणि नांदगाव तालुक्यातील शेतीपिकांना याचा तडाखा बसला. मका, सोयाबीन, कांदा व कापूस पिकांचे नुकसान झाले. एकूण ६५ गावांमधील २० हजार २२२ शेतकऱ्यांचे १३ हजार ८०१ हेक्टरचे नुकसान झाले. तुलनेने धुळे, नंदूरबार जिल्ह्यात की पाऊस असून नुकसानही कमी आहे.

जळगावः शेतजमीन खरवडून गेली

जळगाव जिल्ह्याला अतिवृष्टी नवी नाही. यात भरडला गेला तो शेतकरी राजा. दरवर्षी सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये शेतकऱ्यांच्या ऐन हातातोंडाशी आलेला घास हिरावून जातो. यंदा तर अतिवृष्टीने कहरच केला आहे. अतिवृष्टीने अनेक शेतकऱ्यांची जमीन खरवडून गेली आहे. तर अनेक ठिकाणी शेतात पाणी साचलेले आहे. त्याचा अजूनही निचरा झालेला नाही.

भडगाव, एरंडोल, पाचोरा, मुक्ताईनगर, पारोळा या तालुक्यांत सर्वांधिक नुकसान झाले आहे. जामनेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड याठिकाणी अतिवृष्टी झाली. मात्र नुकसान कमी आहे. एंरडोलला अंजनी नदीला आलेल्या पुरामुळे पाणी शेतात शिरून सुमारे १५ हजार ४९१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. भुसावळला तापी नदीचे पाणी शेतात शिरल्याने याठिकाणी चार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. मुक्ताइनगर, पारोळा येथे वादळीवाऱ्यासह अतिवृष्टीने सुमारे आठ हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाले.

भडगाव, पाचोरा तालुक्यात अतिवृष्टीने नद्या नाल्यानां पूर, शेतात पाणी, गावातील घरांमध्ये पाणी शिरले हाहाकार उडाला होता.भडगाव तालुक्यात ३५४ घर, व्यावसायीकांचे नुकसान झाले. आमडदे येथे केळी कपाशी, मका पिकांचे मोठे नुकसान आहे. येथीलच अनेक ठिकाणची जमीन खरवडून गेली आहे.

जळगाव जिल्‍ह्यात मोठे नुकसान

जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पाच व्यक्तिंचा मृत्यू झाला. तर एक हजार ९२२ इतक्या पशुधनांचा मृत्यू झाला. त्यात ८६ मोठे तर १८० लहान पशुधन आहे. एकूण एक हजार ६८ घरे नष्ट झाली. तर जनावरांचे ५४ गोठ्यांचे नुकसान झाले. जिल्ह्यात घरात पाणी शिरलेले कुटुंबीय ६८७ आहेत. १८०० पेक्षा अधिक अन्न पाकिटे या कुटुंबांना पोहोचती करण्यात आली.

जळगाव जिल्ह्यात एकूण ८० हजार ८२७ हेक्टर पिकांचे नुकसान झाले. यात सर्वाधिक नुकसान भडगाव (२२ हजार ४९३ हेक्टर) व एरंडोल (१५ हजार ४९१ हेक्टर) तर सर्वात कमी नुकसान रावेर (९३.५० हेक्टर) तालुक्यात झाले.

कापसाचे सर्वाधिक नुकसान झाले असून पुढीलप्रमाणे, कापूस (५३ हजार ७१७ हेक्टर), मका (१८ हजार १४० हे.) सोयाबीन (तीन हजार ९२ हे.), ज्वारी (एक हजार ३४८), कांदा (५९३), भाजीपाला (३६), तूर (एक हजार २८५) इतर (८५० हे), ऊस (१९.२० हे.), केळी (एक हजार २६१हे.), फळपिके (४८४ हे.)

 flood damage inspection
महाराष्ट्र सरकारचे पॅकेज जाहीर! कुठल्या शेतकऱ्यांना किती मदत मिळणार?

नाशिकः २० हजार २२२ शेतकऱ्यांना फटका

राज्यात अतिवृष्टीने थैमान घातलेले असताना उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांच्या पावसाने मालेगाव आणि नांदगाव तालुक्यातील शेतीपिकांना याचा तडाखा बसला. खानदेशातील जळगाव व धुळे जिल्ह्याला लागून असलेल्या या दोन्ही तालुक्यांतील मका, सोयाबीन, कांदा व कापूस पिकांचे नुकसान झाले. जिल्ह्यात एकूण ६५ गावांमधील २० हजार २२२ शेतकऱ्यांचे १३ हजार ८०१ हेक्टरचे नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाने केली आहे.

यंदा मेपासूनच पावसाला सुरुवात झाली. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे पूर येत असून जमीन नापिक होण्याचा धोका वाढला आहे. शेतात पाणी साचल्यामुळे उभी पिके जागेवरच करपायला लागली. गेल्या ऑगस्टमध्ये अतिवृष्टीमुळे ४० गावांतील ४०१४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. कांदा, सोयाबीन, मका यासह फळपिकांना याचा फटका बसला होता. सप्टेंबरमध्ये पुन्हा अतिवृष्टीचा तडाखा बसला. मराठवाड्यातील सोलापूर, बीड येथील पावसाच्या तुलनेत नाशिकमध्ये कमी प्रमाणात पडल्याने शेतकऱ्यांना तेवढाच दिलासा वाटून गेला. मालेगाव, नांदगाव, सुरगाणा तालुक्यात पावसाने शेतीचे पुन्हा मोठे नुकसान केल्याचे समोर आले आहे.

कृषी विभागाच्या नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात १३ हजार ८०१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. पावसाने ५११९ हेक्टरवरील कापूस, ४६३१ हेक्टरवरील मका, २१९५ हेक्टरवरील कांदा, १७५३ हेक्टरवरील बाजरी व इतर पिके, पाच हेक्टरवरील सोयाबीन आणि ९९ हेक्टरवरील डाळिंबाचे नुकसान झाले. जिरायत क्षेत्रातील १३ हजार ७०३ तर बहुवार्षिक फळपिकांच्या सुमारे ९९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. या बाबतची माहिती जिल्हा कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी दिली. २० हजारहून अधिक शेतकरी बाधित अतिवृष्टीत मालेगाव तालुक्यातील (३४), नांदगाव तालुक्यातील (२८), सुरगाण्यातील (तीन) असे एकूण ६५ गावे बाधित झाली. मालेगावमधील १९ हजार ३९५, नांदगावचे ८१८ व सुरगाण्यातील ९ असे एकूण २० हजार २२२ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

ऑगस्टमध्ये अतिवृष्टीमुळे ४०१४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्याचे पंचनामे पूर्ण करून प्रशासनाने नुकसानीचा अंतिम अहवाल शासनाला सादर केला आहे. बाधित शेतकऱ्यांची संख्या ७ हजारहून अधिक असून शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने तीन कोटी ८१ लाख ६७ हजार रुपयांच्या मदतीची मागणी केली आहे.

नुकसानग्रस्तांना भरपाई

जून ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टी किंवा पूरामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे आदेश राज्याच्या महसूल व वन विभागाने मंगळवारी (ता.२३) निर्गमित केले आहेत. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून ही मदत केली जाणार असून त्यासाठी राज्य शासनाने १३३९ कोटी ४९ लाख २५ हजारांची तरतूद केली आहे. विभागीय महसूल आयुक्तांनी राज्य शासनाकडे मदतीचे प्रस्ताव यापूर्वीच सादर केले आहेत. शेतकर्यांच्या खात्यावर थेट ही रक्कम जमा (डीबीटी) करण्याचे आदेश शासनाने दिले.

धुळे जिल्ह्यात ९१८० हेक्टरचे नुकसान

धुळे जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पंधरा गावातील दहा हजार ७१५ शेतकरी बाधित आहे. जिल्ह्यात ९१८० हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक नुकसान कापूस पिकाचे ७४०४ हेक्टर, मका १६९५ हेक्टर, बाजरी १९, ज्वारी ०.८० , तूर २, सोयाबीन ०.५०, कांदा १६, फळफिक ४२ हेक्टर असे नुकसान आहे.

नंदुरबार जिल्ह्यात सात जणांचा मृत्यू

नंदुरबार जिल्ह्यात यंदा ८० टक्के पाऊस झाला आहे. पाच मध्यम तर १३ लघुप्रकल्पात चांगला जलसाठा आहे. एप्रिल ते सप्टेंबर आजअखेरपर्यंत एकूण नैसर्गिक आपत्तीत सात जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. ११ दुधाळ पशुधन जखमी असून ३६ पशुधनांचा मृत्यू झाला आहे. अतिवृष्टीमुळे कोणीही क्षतिग्रस्त झालेले नाही. ९९१ घरांचे अंशतः नुकसान झाले. १२ पक्क्या घरांचे नुकसान आहे. आठ गोठ्यांचे नुकसान झाले आहे.

जळगाव जिल्ह्यातील सहा तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. भडगाव, पाचोरा जास्त बाधित आहे. नुकसानीचे पंचनामे झाले आहे. काही ठिकाणी सुरू आहे. घरांचे नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत दिली आहे. अनेक ठिकाणी जेवणाची पाकिटे देऊन मदत केली. अतिवृष्टीचा अहवाल मुख्यमंत्री जळगावला आले तेव्हा त्यांना सादर केला. पावसाची स्थिती, पूर परिस्थिती व पंचनामा कामकाजाबाबत सविस्तर माहिती दिली. आपद्ग्रस्तांना मदतीसाठी ११५ कोटींची मागणी आहे.

- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जळगाव

पंचनाम्याचा शासनाने फार्स करू नये

शेतकऱ्यांना तातडीने मदत देणे गरजेचे आहे. पुरामुळे जमिनीच वाहून गेली आहे. तर काय नुकसान झाले हे कसे कळणार, सरसकट नुकसान भरपाई दिली पाहिजे. पंचनामे केव्हा होणार आणी मदत केव्हा मिळणार. पंचनामे करण्यासाठी कृषी विभागाकडे माणसेही नाही. शेतकऱ्यांची सामाजिक संघटनांनी प्रत्येक गावात शेतकऱ्यांची मदत केली पाहिजे. शेतकऱ्यांची नुकसान झाल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. त्याने घेतलेल्या कर्जाची परतफेड शासनाने करावी. त्याच्या मदतीसाठी सामाजिक संघटनांनी पुढे यावे.

एस.बी.पाटील, जळगाव (शेतकरी कृती समिती सदस्य)-

जिल्ह्यात मागे हजारो शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले होते. मी स्वतः प्रत्यक्ष पाहणी केली आणि पंचनामे जलद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातला १० कोटींचा निधी मिळत आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. शासन नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहील. सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना लवकरच मदत जाहीर होणार आहे.

- पालकमंत्री गुलाबराव पाटील, जळगाव.

जिल्ह्यात पाचोरा, भडगावसह सहा तालुक्यात अतिवृष्टी झाली. केळी, कापूस, सोयाबीनचे मोठे नुकसान आहे. पंचनामे सुरू आहे. अनेक शेतात पाणी आहे. यामुळे पंचनाम्यास उशीर होत आहे. लवकरच ते पूर्ण होऊन त्याचा अहवाल शासनाला दिला जाईल. आतापर्यंत ८० हजारापेक्षा अधिक हेक्टरवर पंचनामे पूर्ण झाले आहेत.

- के.एम.तडवी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com