येवला : अनेक जण इडीच्या (ED) धाकापोटीच भाजपसोबत (BJP) गेले असून, बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना (Shivsena) टिकावी, अशी प्रामाणिक इच्छा आहे, असे प्रतिपादन माजी पालकमंत्री आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी येथे केले. (Chhagan Bhujbal claims that Many rebel join BJP due to ED)
श्री. भुजबळ येवला दौऱ्यावर होते. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजपसोबत शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी सत्ता स्थापन केली असून, पूर्ण काळ यांचे सरकार टिकेल का, यावर श्री. भुजबळ म्हणाले, की लग्न झाल्यावर आपण लगेच घटस्फोट घ्या, असे म्हणत नाही. त्यामुळे ‘नांदा सौख्यभरे’ अशा शुभेच्छा मी देतो, आशा मिश्कील शब्दात त्यांनी भूमिका मांडली. राज्यात नवीन स्थापन झालेल्या सरकारने जनतेचे प्रश्न मार्गी लावावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
शिवसेनेमध्ये दुफळी निर्माण होण्याची शक्यता आहे, याबाबत भुजबळ म्हणाले, की शिवसेना स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून मी शिवसेनेत होतो. नाशिकमधील अनेक शिवसेनेच्या शाखांचे मी उद्घाटन केले. अनेक आमदारांना मी शाखाप्रमुख म्हणून नेमले आहे. त्यामुळे ही संघटना संपावी, असे माझ्यासह कोणालाही वाटत नाही. काही मतभेद असू शकतील.
ते पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार राष्ट्रीयीकृत व जिल्हा बँकांनी लवकरात लवकर शेतकरी कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, तसेच शेतकऱ्यांना बियाणे, खतवाटप करताना अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी. विक्रेत्याकडून शेतकऱ्यांना बियाणे, खत खरेदी करताना इतर वस्तू खरेदी करण्याची सक्ती होणार नाही, याकडे लक्ष द्यावे. विक्रेता सक्ती करीत असेल, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.
येथील संपर्क कार्यालयात अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीस तहसीलदार प्रमोद हिले, तालुका उपनिबंधक प्रताप पाडवी, मुख्याधिकारी नागेंद्र मुतगेकर, कार्यकारी अभियंता सागर चौधरी, उपअभियंता उन्मेष पाटील, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा कृपास्वामी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हर्शषल नेहेते, गटविकासाधिकारी अन्सार शेख, इवदचे कुलकर्णी, महावितरणचे जाधव, बोरसे, कृषी अधिकारी यांच्यासह शेतकरी व बँकेचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
तालुक्यातील पावसाचा आढावा घेऊन पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये टँकर सुरू ठेवावेत, तसेच अतिवृष्टी व पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी तालुक्यातील यंत्रणेने सज्ज राहण्याच्या सूचना भुजबळ यांनी दिल्या. शहर स्वच्छता, पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, कोरोना यासह विविध सुरू असलेल्या कामांचा आढावा त्यांनी घेतला. कोरोनासोबत साथरोगाबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यात येऊन रस्त्याअभावी बस बंद होणार नाहीत, तसेच शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.