
जळगाव : ''शंभर वर्षापासून आमचे घराणे काँग्रेसचे आहे. त्यामुळे सध्या काँग्रेसमध्ये सुरू असलेला वाद दुर्दैवी आहे. मी अपक्ष आमदार आहे. आमच्या घराण्याच्या राजकीय संबधामुळे निवडणुकीत भाजपनेही मदत केली असणार, मला सर्वच पक्षाची मदत झाली, त्यामुळे आगामी काळात मी भाजपमध्येही नाही आणि काँग्रेसमध्येही जाणार नाही मी अपक्षच राहणार आहे. जर तरच्या प्रश्नांना मी उत्तरं देत नाही'', असं मत आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केलं आहे. ते जळगावमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
निवडणूक निकालानंतर आमदार सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) प्रथमच जळगाव (Jalgaon) जिल्हा दौऱ्यावर आले. आज ते सर्वच पक्षातील नेत्यांच्या भेटी घेत आहेत. जळगाव येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले, ''मी अपक्ष म्हणून निवडून आलो आहे.
सर्वच पक्षाने मला साथ दिली. मी भाजपचा पाठींबा मागितला नव्हता. त्यांनीही दिला नव्हता. परंतु त्यांनी निवडणुकीत मला साथ दिली असल्याची शक्यता आहे. कारण आमचे घराणे गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात आहे. त्यामुळे आमचे सर्वच पक्षातील लोकांबरोबर चांगले संबध आहेत'', असं ते म्हणाले.
जर काँग्रेसने निलंबन मागे घेतले तर आपण काँग्रेसमध्ये कार्य करणार का? या प्रश्नाला उत्तर देतांना सत्यजीत तांबे म्हणाले, ''जर असे झाले तर तसे झाले तर काय? अशा प्रश्नांना आपण उत्तर देत आहे. आज आपण अपक्ष म्हणून निवडून आलो आहोत. जनतेने आपल्याला अपक्ष म्हणून मतदान केले आहे. त्यामुळे आता आपण अपक्षच राहणार आहोत, भाजप व पुन्हा काँग्रेस पक्षात जाण्याचाही आपला प्रश्नच निर्माण होत नाही, असं ते म्हणाले.
युवकाच्या प्रश्नाबाबत ते म्हणाले, ''क्रिडा व युवक कल्याण केंद्र आहे. त्याचा प्रमुख जिल्हा क्रिडा अधिकारी असतात, मात्र, त्या ठिकाणी केवळ क्रिडा क्षेत्राकडे लक्ष दिले जाते. त्यामुळे आपण युवकांचे उच्च शिक्षण, व्यवसायिक शिक्षण तसेच नोकरीच्या मार्गदर्शनाचे प्रश्न सोडविण्यसाठी उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यात युवक कल्याण कार्यालय उघडण्यासाठी प्रयत्नशिल राहणार आहोत.
जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण त्यासाठी जागेची मागणी करणार आहोत. त्या कार्यालयात युवकांना रोजगारांच्या कुठे कोणत्या संधी उपलब्ध आहेत, याचे मार्गदर्शन मिळेल. त्या ठिकाणी त्यासाठी तज्ञ अधिकारी मार्गदर्शनासाठी उपस्थित राहतील. उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यात आपला हा पहिला प्रयत्न असेल, हा जर यशस्वी झाला तर हाच ‘पॅटर्न’ संपूर्ण जिल्ह्यात राबवून त्या ठिकाणी युवक कल्याण कार्यालय सुरू करण्यात येईल, असंही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, राज्यातील जुन्या पेन्शन योजनेबाबत आमदार तांबे म्हणाले, ''राजस्थान, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश या राज्यात पुन्हा जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठी आपण एक शिष्टमंडळ त्या राज्यात घेवून जाणार आहोत. त्याचा अभ्यास करून त्याप्रमाणे महाराष्ट्रातही जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आपला प्रयत्न राहील'', असे मतही त्यांनी व्यक्त केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.