धुळे : आम्ही दोन-दोन, तीन-तीन टर्मपासून नगरसेवक आहोत. मात्र, महापालिकेची इतकी वाईट स्थिती कधीच बघितली नव्हती. समस्या सोडविण्यात सत्ताधारी भाजप कमी पडत आहेत, प्रशासनावर त्यांचा बिलकूल वचक नाही, अशा शब्दांत विरोधी पक्षनेत्यांसह विरोधी सदस्यांनी स्थायी समिती सभेत सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीचा पंचनामा केला.
महापालिका स्थायी समितीची सभा गुरुवारी झाली. यावेळी नगरसेवक म्हणाले, शहरातील कचरा संकलन, पथदीप बसविणे, जलवाहिन्यांचे लिकेज काढणे, पाणीपुरवठा, खड्डे बुजविणे अशा साध्या समस्या वारंवार तक्रारी करूनही सुटत नाहीत. एकीकडे पैसे मिळत नाहीत म्हणून ठेकेदार काम करत नाहीत, तर दुसरीकडे विशिष्ट ठेकेदारांसाठी ठेव पावत्या मोडल्या गेल्या, अशी गंभीर स्थिती आहे.
सभापती संजय जाधव, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, नगरसचिव मनोज वाघ, सदस्य, अधिकारी उपस्थित होते. समाजवादी पक्षाचे सदस्य अमीन पटेल यांनी विविध प्रश्नांवर सत्ताधारी, प्रशासनावर निशाणा साधला. महापालिकेत यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचीही सत्ता होती, पैशांची कमतरता होती. मात्र, एवढ्या समस्या पाहिल्या नाहीत. कचरा संकलनासाठी शासनाने परवानगी दिल्यानंतरही कार्यादेश देण्यात दिरंगाई होत असेल तर प्रशासन कुठेतरी कमी पडत आहे. सत्ताधाऱ्यांचाही वचक राहिलेला नाही. गेल्या दोन महिन्यांतच पैसे गायब कसे झाले, असा प्रश्न श्री. पटेल यांनी केला.
विरोधी पक्षनेते अखेर बरसले
विरोधी पक्षनेते राष्ट्रवादी काँग्रेसचे कमलेश देवरे एरवी शांत, संयमी असतात. मात्र, त्यांनी आक्रमकपणे व मुद्देसूद मांडणी करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले, की सहकारी सदस्य पटेल यांनी जे मुद्दे मांडले. त्यात काहीही असत्य नाही. जे नगरसेवक फील्डवर असतात त्यांना रोजच नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. मीदेखील तीनदा निवडून आलो पण मनपाची इतकी भयानक स्थिती कधीच नव्हती. भाजपला ५० जागा देऊन सत्तेत बसविले. मात्र छोट्या-छोट्या समस्या सुटत नाहीत.
सत्ताधारी भाजप बदनाम झाला आहे. निम्म्या घंटागाड्या बंद असताना शंभर टक्के बिल कसे निघते. कुणी हप्ते घेतात का, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे धागेदोरे आहेत का, ठेव पावती का मोडली गेली, अशा प्रश्नांचा भडिमार त्यांनी केला. माझ्या प्रभागात सध्या पोटनिवडणूक आहे मात्र मते मागताना लाज वाटते. या सर्व परिस्थितीला अधिकारी दोषी की पदाधिकारी हा प्रश्न आहे. त्यामुळे आता महापालिकेत सत्यनारायणाची पूजा करा, काहीतरी चांगले होईल.
सत्ताधाऱ्यांकडून घरचा आहेर
सत्ताधारी भाजप सदस्यांनीही सभेत समस्यांचा पाढाच वाचला. पुष्पा बोरसे, मंगला पाटील, अमोल मासुळे यांनी आपापल्या प्रभागातील समस्या सुटत नसल्याने संताप व्यक्त केला. २५ लाखांच्या डस्टबिनपैकी २५ डस्टबिन आणून दाखवा, असे आव्हान देत सदस्य सुनील बैसाणे यांनी या प्रकरणी डस्टबिन मिळून आली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांच्या मानधनातून पैसे कपात करावेत, अशी मागणी केली.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.