Ahmednagar News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शिर्डी दौरा यशस्वी व्हावा, यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. सभेसाठी नगर जिल्ह्यातून मोठी गर्दी जमवण्यासाठी मंत्री विखे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत. यावर गर्दीच्या टार्गेटवर माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी तोफ डागली आहे.
"भाजपवर शेतकरी वर्ग मोठा नाराज आहे. त्यामुळे त्यांना गर्दी जमवण्याचे टार्गेट असणारच. गर्दी जमवण्यासाठी आता गावनिहाय बैठका घेण्याची वेळ भाजपवर आली आहे", अशी टीका आमदार तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत शुक्रवारी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 ऑक्टोबरला शिर्डी येथे येत आहेत. पालकमंत्री विखे आणि भाजपचे सर्व आमदार, खासदार, पदाधिकारी यांच्याकडून जय्यत तयारी सुरू आहे. पंतप्रधान मोदी यांची सभा यशस्वी व्हावी, यासाठी जय्यत तयारी सुरू आहे.
मोठी गर्दी जमवण्याचे टार्गेट मंत्री विखे यांनी घेतले आहे. तशा आमदार, खासदार, पदाधिकारी यांना सूचना आहेत. त्यानुसार कामेदेखील सुरू झाली आहेत. नगर तालुक्यातून एक लाख नागरिक सभेला जातील, असे सांगितले जात आहे. या सभेला गर्दी करण्याच्या टार्गेटवर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी निशाणा साधला आहे.
"भाजपवर शेतकरी प्रचंड नाराज आहेत. त्यामुळे त्यांना गर्दी जमवण्याचे टार्गेट असणारच आहे. परंतु ही गर्दी जमवताना कार्यकर्ते, पदाधिकारी यांनाच न्यावे. शासनाची वाहने गर्दी गोळा करण्यासाठी वापरू नयेत, शासन आपल्या दारी कार्यक्रमावेळी एसटी बसेस कार्यक्रमाला वापरल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले होते. हा प्रकार जनता विसरलेली नाही", अशी टीका आमदार तनपुरेंनी केली.
"आता पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी शाळांना सुटी देणार असाल, तर ही गंभीर बाब आहे. समूह शाळांच्या नावाखाली दुर्गम भागातील शाळा बंद करण्याचा निर्णय सरकार घेत आहे. यावरून हे सरकार शिक्षणाबाबत किती गंभीर आहे, हे दिसते आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास निश्चितपणे आम्ही विरोध करू", असा इशारा तनपुरे यांनी दिला.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते निळवंडे धरणातील पाणी सोडले जाणार आहे. निळवंडे धरणाच्या पायाभरणीचे खरे काम महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाले. तत्कालीन मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांच्या प्रचंड पाठपुराव्यामुळे निळवंडे धरणाच्या कालव्यांचे काम मार्गी लागले.
महाविकास आघाडी सरकार अगोदर भाजपचे सरकार होते. त्यांनी पाच वर्षांत जेवढा निधी दिला, त्यापेक्षा महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळात दिला. त्यामुळे निळवंडे धरणाचे काम महाविकास आघाडी सरकारच्या काळातच झाले आहे. आता निळवंडे धरणाच्या कामाचे श्रेय हे सरकार घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. महाविकास आघाडीचे सरकार गेल्यावर धरणाचे काम सात ते आठ महिने बंद होते.
निळवंडेचा उजवा कालवा राहुरीपासून जातो, तिथे आता पाणी यायला पाहिजे होते. परंतु वन विभागाच्या यांना परवानग्या मिळत नाहीत. काम अपूर्ण असतानादेखील पंतप्रधानांच्या हस्ते निळवंडेचा कार्यक्रम होतोय, हे दुर्दैव आहे", असे आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले.
Edited by Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.