Ahmednagar Politics : नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात हे एकमेकांना कधी कोणता राजकीय धक्का देतील, याचा नेम नाही. ग्रामपंचायत निवडणुकीतदेखील ते अनुभवायला मिळाले. यात थोरात-कोल्हे युतीने मंत्री विखेंवर सरशी केली. याचा आनंद साजरा होत असताना मंत्री विखे यांनी आमदार थोरात यांना मोठा राजकीय धक्का दिला आहे.
महाविकास आघाडीच्या काळात संगमनेर तालुका पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलेली सात गावे, पुन्हा शिर्डी विधानसभा मतदारसंघात असलेल्या आश्वी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे. मंत्री विखेंनी आमदार थोरात यांना हा मोठा राजकीय धक्का दिल्याचे मानले जात आहे.
महाविकास आघाडी सरकार असताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कनकापूर, कनोली, हंगेवाडी, ओझर बुद्रुक, ओझर खुर्द, रहिमपूर, मनोली ही सात गावे संगमनेर पोलिस ठाण्यात जोडली. यासाठी थोरात यांनी राजकीय दबाव आणला. आघाडी सरकारचा हा निर्णय एकप्रकारे अन्यायकारक असा होता. या गावांना संगमनेर पोलिस ठाणे सुमारे 20 किलोमीटर अंतरावर होते. तशी ग्रामस्थांमध्ये याविषयी नाराजी होती. ग्रामस्थांनी याविषयी पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिले. तत्कालीन गृहमंत्री यांची भेट घेऊन, ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीमध्ये घेतलेले ठराव सादर केले. परंतु कार्यवाही झाली नाही.
दरम्यान, राज्यातील सत्तेत बदल झाला. भाजप महायुतीची सत्ता आली. राधाकृष्ण विखे हे राज्याचे महसूल तथा नगरचे पालकमंत्री झाले. मंत्री विखे यांनी या सात गावांच्या मागणीचा विचार करून पूर्वीचा निर्णय आता फिरवला आहे. ही गावे शिर्डी विधानसभा मतदारसंघात असलेल्या आश्वी पोलिस ठाण्याला जोडली आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मंत्री विखे यांनी या निर्णयासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला. वस्तुस्थिती निर्दशनास आल्यानंतर मंत्री फडणवीस यांनीदेखील निर्णयाला ग्रीन सिग्नल दिला. मंत्री विखे यांच्या या पाठपुराव्याने निर्णय झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. मंत्री विखे यांच्या या पाठपुराव्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार थोरात यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.