

PCPNDT case Maharashtra : अहिल्यानगरच्या राहाता तालुक्यातील निर्मळ पिंपरी इथल्या बेकायदा गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रूणहत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार इंडियन मेडिकल असोसिएशनचा माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे आणि त्यांच्या साथीदारांवर केवळ गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई न करता, त्यांच्यावर थेट हत्येचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी श्रीरामपूर-राहुरी मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आमदार ओगले यांनी या संदर्भात थेट मुख्यमंत्र्यांकडे थेट तक्रार केल्याने वैद्यकीय क्षेत्रासह महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
श्रीरामपूर आमदार हेमंत ओगले यांनी मुख्यमंत्र्यांना (Devendra Fadnavis) पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, "जीव वाचविण्याचा व्यवसाय सोडून पैशाच्या हव्यासापोटी काही डॉक्टर मुलींच्या जन्माआधीच त्यांच्या हत्येचा घृणास्पद व्यवसाय करत आहेत. ही घटना अमानवी आणि महाराष्ट्राच्या सामाजिक विवेकाला काळिमा फासणारी आहे." या गुन्ह्यातील गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. रवींद्र कुटे व अन्य डॉक्टरांचा वैद्यकीय व्यवसायाचा परवाना तात्काळ आणि कायमस्वरूपी रद्द करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
श्रीरामपूर (Shrirampur)-राहुरी विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये स्त्री जन्मदर 800 पेक्षा कमी झाला असून, ही परिस्थिती समाजासाठी अत्यंत धोक्याची आहे. याबाबत 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले होते, तरी देखील असे रॅकेट सुरू राहणे हे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे, असेही आमदार ओगले यांनी पत्रात नमूद केले आहे.
या संपूर्ण रॅकेटची उच्चस्तरीय चौकशी करून केवळ डॉक्टरच नव्हे, तर त्यांना मदत करणारे अधिकारी, कर्मचारी आणि इतर सहभागी व्यक्तींवरही कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. ही साखळी महाराष्ट्रपातळीवर असून, त्यापुढे देखील असल्याची शंका आहे. अशा नराधमांना कोणतीही सहानुभूती दाखविणे म्हणजे समाजातील मुलींच्या अस्तित्वालाच धोका निर्माण करण्यासारखे आहे, अशीही भीती आमदार ओगले यांनी व्यक्त केली.
आमदार हेमंत ओगले यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलला स्वतंत्र पत्र पाठवित यात सहभागी असलेल्या डाॅ.कुटेसह अन्य डाॅक्टरांचे परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, अपर अधीक्षक यांनाही पत्राच्या प्रती पाठवून तातडीने कारवाई करण्याची विनंती केली आहे. ओगले यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आता शासन आणि प्रशासन या प्रकरणाकडे किती गांभीर्याने पाहते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
बेकायदा गर्भलिंग निदान प्रकरणात ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चा राज्याच्या माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे याच्या 12 जणांना अटक केली आहे. मुख्य दुवा एजंट, आणि महिलांची गर्भलिंग निदान करणारा प्रदीप ढगे हा केवळ बारावी शिकलेला असून, तो नावापुढे डाॅक्टर लावून घेत असल्याचेही समोर आले आहे. या चाचण्याचे ठिकाणीची पाळीव जनावरांचा गोठा, कांद्याची चाळ, तर कधी धावत्या चारचाकी वाहनात सेटअप करून केल्या जायच्या. या सर्व आरोपींना 10 मे रोजी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
गर्भलिंग निदान केल्यानंतर, पुढे गर्भात मुली असल्याचे निदान झाल्यावर सहाजिक गर्भपात व्हायचा. हे रॅकेट कधीपासून चालवले जायचे, याच्या मुळाशी श्रीरामपूर पोलिसांना अजून पोहोचायचे आहे. त्यांनतरच किती मुलींचा गर्भपात झाला असेल याचा अंदाज येईल. तसेच गर्भपात कुठे, कसे, केव्हा व्हायचे, त्याचे एजंट वेगळे होते का? असे एक ना अनेक प्रश्नांचा गुंता पोलिसांना सोडवायचा आहे. यात महिलेला पहिलं अपत्य मुलगी असेल, तर दुसऱ्या अपत्यावेळी गर्भलिंग निदानमध्ये मुलीच असल्याचे लक्षात आल्यावर पुढे शंभर टक्केच गर्भपात होत असणार, अशी शंका पोलिसांना आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असणार असून, तपासाला वेळ लागणार असल्याचे संकेत श्रीरामपूर पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.