
Rahul Kardile new Commissioner of Nashik Municipal Corporation News: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने नाशिकमध्ये भाकरी फिरवली आहे. वर्धा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे महापालिकेच्या कारभारात काय सुधारणा होते याची उत्सुकता आता सगळ्यांना आहे.
शासनाने आज काढलेल्या विशेष आदेशानुसार वर्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची नाशिक महापालिका आयुक्त म्हणून बदली केली आहे. गेली अनेक दिवस वादाचा विषय ठरलेले आणि सध्या वैद्यकीय रजेवर असलेले महापालिका आयुक्त अशोक करंजकर यांच्या जागेवर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. करंजकर यांना मात्र कोणतीही नियुक्ती देण्यात आलेली नाही. होऊ घातलेल्या महापालिका निवडणुका आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने ही बदली महत्त्वाची मानली जाते.
शासनाचे सहसचिव प्रशांत साजणीकर यांनी या बदलीचे आदेश काढले आहेत. कर्डिले यांना तातडीने महापालिका आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारण्याच्या सूचना करण्यात आली आहे. आपल्या पदाचा कार्यभार त्यांनी नागपूर(Nagpur) विभागीय महसूल आयुक्त यांच्या सूचनेनुसार वर्ग करावा असेही आदेशात म्हटले आहे. त्यामुळे कर्डिले उद्याच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारण्याची शक्यता आहे.
शहरातील बांधकाम व्यावसायिकांच्या एका वादग्रस्त भूसंपादनाबाबत आयुक्त करंजकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. भूसंपादनाच्या या प्रकरणात त्यांनी कोणालाही विश्वासात न घेता एका रात्रीतून संबंधित भूसंपादनाबाबत 55 कोटी रुपयांचा धनादेश संबंधितांना अदा केला होता. शहरातील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी संपादित करण्यात आलेल्या 300 हून अधिक शेतकऱ्यांनी गेल्या 20 वर्षांपासून महापालिकेने मोबदला दिलेला नाही.
महापालिकेच्या स्थायी समितीच्या तत्कालीन सभापती आणि प्रशासनाने अनेक निरुपयोगी आणि महापालिकेला कोणताही लाभ नसलेल्या जमिनींचे संपादन केले होते. त्यासाठी 800 हून अधिक कोटी रुपयांचा निधी संबंधितांना अदा करण्यात आला होता. या प्रकरणावरून वादळ उठले होते अशातच महापालिका आयुक्त करंजकर यांनी एका रात्रीत 55 कोटींचा निधी धनादेश बांधकाम व्यवसायिकला दिला होता. त्याबाबत राज्य शासनाकडे त्यांच्याविषयी गंभीर तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे करंजकर सातत्याने वैद्यकीय रजेवर जात होते अशी तक्रार आहे.
सध्या वैद्यकीय रजेवर असलेले महापालिका आयुक्त अशोक करंजकर यांच्या कार्यशैलीबाबत अनेक तक्रारी होत्या. या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या शहरातील आमदारांनीही तक्रारी केल्या होत्या. तसेच भाजप(BJP) आणि शेतकऱ्यांनी त्यांच्याविरोधात मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनाच्या दबावातूनच अशोक करंजकर गेली सहा महिने सातत्याने रजेवर जात होते. ते शासनाच्याही संपर्कात नव्हते असेही बोलले जाते. विशेषता नगर विकास विभागाने त्यांच्याकडे काही विषयांबाबत खुलासा मागविल्याचीही चर्चा आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.