Nashik News: अलाहाबादच्या महाकुंभमेळ्याची सर्वत्र चर्चा आहे. यामध्ये नाशिकला होणाऱ्या कुंभमेळ्याच्या प्रश्नावर खासदार वाजे यांनी बोट ठेवले आहे. केंद्र सरकार याबाबत काय करीत आहे, असे त्यांनी थेट संसदेत विचारले.
अर्थसंकल्पाच्या अभिभाषणावर खासदार राजाभाऊ वाजे यांनी काल संसदेत भाषण केले. यावेळी ते म्हणाले, नाशिकमध्ये नाशिक, त्र्यंबकेश्वर, कावनई आणि टाकेद या चार ठिकाणी कुंभमेळा होतो. या कुंभमेळ्यासाठी विविध सुविधा करण्याची आवश्यकता आहे. याबाबत केंद्र सरकार काय करणार आहे.
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विविध पायाभूत सुविधा कराव्या लागणार आहेत. या सुविधा पुरेसा वेळ असतानाच कराव्या लागतील. त्याचे काम वेळेत सुरू झाले नाही, तर या सुविधांच्या गुणवत्तेवर प्रश्न निर्माण होईल. त्याची उपयुक्तता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी केंद्र शासनाने निधी दिला पाहिजे. त्यासाठी अर्थसंकल्पात काहीही तरतूद करण्यात आलेली नाही. यावर त्यांनी नेमकेपणाने केंद्र शासनाच्या कामकाजावरच बोट ठेवले. ते म्हणाले, एखाद्या योजनेसाठी वेळेत नियोजन आणि निधी देणे आवश्यक आहे. तसे केल्यास चांगल्या सुविधा उपलब्ध करता येतात. मात्र सरकारचे धोरण पाहता ऐनवेळी चार सहा महिने आधी निधी दिला जातो.
अशाप्रकारे ऐनवेळी निधी दिल्यास मग तो निधी खर्च कसा करायचा यासाठी प्रशासनाची धडपड असते. त्यातून कॉन्ट्रॅक्टर ओरिएंटेड कामे होतात. कुंभमेळा कॉन्ट्रॅक्टर ओरिएंटेड करू नये. त्यासाठी वेळेतच पुरेसा निधी केंद्र शासनाने उपलब्ध करावा, अशी मागणी खासदार वाजे यांनी केली.
खासदार वाजे यांनी नाशिक जिल्ह्यात यंदा बंपर कांद्याचे पीक येणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने वेळीच जागे व्हावे. कांदा निर्यातीवर लावण्यात आलेले वीस टक्के निर्यात शुल्क तातडीने रद्द करावे. जागतिक बाजारपेठ कांद्यासाठी खुली करावी. अन्यथा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागेल.
केंद्र शासनाने याबाबत जागरूकपणे शेतकऱ्यांच्या समस्या समजून घ्याव्यात. शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी. पंतप्रधान बीज योजनेत नाशिक जिल्ह्याचा समावेश करावा. दुर्दैवाने याबाबत केंद्राच्या अर्थसंकल्पात काहीही तरतूद आणि व्यवस्था करण्यात आल्याचे दिसत नाही अशी टीका त्यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.