
Dhule farmers News: एखाद्या आमदाराने विधानसभेत प्रश्न मांडल्यावर मतदार संघात त्याचे कौतुक होते. धुळे ग्रामीण मतदार संघात मात्र चित्र उलटे आहे. विधिमंडळात प्रश्न मांडणाऱ्या आमदारावर मतदारसंघातील शेतकरी चांगलेच संतापले आहेत.
भारतीय जनता पक्षाचे धुळे ग्रामीण मतदार संघाचे आमदार राम भदाणे यांनी हिवाळी अधिवेशनात सिंचनाचा प्रश्न मांडला. यावेळी त्यांनी अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांचे अस्तरीकरण करण्याची मागणी केली. त्याबाबत ते चांगलेच आग्रही दिसले.
आमदार भदाणे यांनी विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित केला. मात्र धुळे ग्रामीण मतदारसंघात येताच त्यांना शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध सहन करावा लागत आहे. मतदारसंघातील शेतकरी आमदार भदाणे यांच्यावर चांगलेच संतापले आहेत. जो प्रश्न शेतकऱ्यांनी कधी मांडलाच नाही त्याला भदाणे का महत्व देत आहेत, असा प्रश्न मतदारसंघात केला जात आहे.
भाजपच्या आमदार भदाने यांना मतदार संघातच होणारा हा विरोध चर्चेचा विषय ठरला आहे. राम भदाणे यांनी विधिमंडळात हा प्रश्न मांडला. त्यानंतर लगेचच शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून या मागणीला विरोध दर्शविणारे निवेदन दिले आहे.
अक्कलपाडा कृती समितीतर्फे शेतकरी आमदार भदाणे यांच्या मागणीने चांगलेच संत आपले आहेत. त्यांनी त्या विरोधात मोठे आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. एवढ्यावर हे प्रकरण थांबले नाही. कृती समितीने थेट मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाशी संपर्क करून त्यांनाही निवेदन पाठविले आहे. त्यामुळे भाजपच्या आमदाराला विधिमंडळात प्रश्न मांडल्यामुळे मतदारसंघातच प्रखर विरोध होऊ लागला आहे. हा विरोध थेट मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचला.
सिंचनाच्या प्रश्नावरून सध्या धुळे ग्रामीण मतदार संघात शेतकरी विरुद्ध आमदार भदाणे असे चित्र पाहायला मिळत आहे. यानिमित्ताने सिंचनाच्या प्रश्नावरून राजकारण चांगलेच तापले आहे. अक्कलपाडा प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्याचे काँक्रीट स्तरीकरण करण्याचा हा प्रश्न आहे. असे अस्तरीकरण झाल्यास परिसरातील शेतीचे वाळवंट होईल. आमदारांना आपल्या मतदारसंघातील शेतीचे वाळवंट करायचे आहे काय? असा प्रश्न या समितीने केला आहे.
संघर्ष समितीचे डॉ लक्ष्मीकांत बोढरे, नेर ग्रामपंचायतच्या सरपंच गायत्रीदेवी जयस्वाल, प्रदीप देसले, जगदीश नेरकर, शाम देसले, देवेंद्र देसले, विलास रौंदळ, भारतभूषण देसले आदींसह मोठ्या संख्येने कृती समितीचे शेतकरी या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा देत आहे.
विधिमंडळात प्रश्न मांडल्यावर सामान्यतः आमदाराचे कौतुक होते. आमदार देखील प्रचारात अशा कामांची यादी मांडत असतात. धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे यांना मात्र विपरीत अनुभव आला आहे. विधिमंडळाचे कामकाज आटोपल्यावर मतदारसंघात येतात त्यांना थेट शेतकऱ्यांनी विरोध सुरू केल्याने या विषयावरील राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. विरोधी पक्षाचे आमदारही हा प्रश्न घेऊन सत्ताधारी आमदाराला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न करीत आहेत.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.