Ahmednagar News : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या काही निवडणुकीचे निकाल शनिवारी (दि.29 एप्रिल) समोर आले. या निवडणुकीमध्ये कर्जत बाजार समिती ही चांगलीच चर्चेत राहिली. या निवडणुकीत भाजपचे आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार या दोन आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
कर्जत बाजार समितीच्या निवडणुकीत राम शिंदे आणि रोहित पवार यांच्या गटाला समसमान म्हणजेच प्रत्येकी नऊ-नऊ जागा मिळाल्या. त्यामुळे कर्जत बाजार समितीत सभापती कुणाचा होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कर्जतकरांनी राम शिंदे आणि रोहित पवार या दोन्ही आमदारांच्या गटाला समसमान जागा दिल्या असल्या तरी आता सभापती निवडीसाठी बहुमत लागेल. त्यामुळे या बहुमतासाठी आता संचालक फोडाफोडीचे राजकारण होण्याची शक्यता आहे.
अशातच खासदार सुजय विखे पाटील यांनी कर्जत बाजार समितीच्या सभापतीपदाबाबत भाष्य केलं आहे. "कर्जत बाजार समितीत सभापती हा भाजपचाच होणार", असं ते म्हणाले.
सुजय विखे म्हणाले, "भाजपला बाजार समितीच्या निवडणुकीत चांगल्या प्रकारचे यश मिळाले. पाथर्डी बाजार समितीत आमची सत्ता नव्हती तेथे आमदार मोनिका राजाळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता आली. श्रीगोंद्यामध्ये आमदार बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली ज्या जागा निवडून आल्या तेथेही भाजपचा सभापती होईल अशी परिस्थिती आहे. कर्जत बाजार समितीत राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 9 जागा आम्हाला मिळाल्या", असं ते म्हणाले.
"अहमदनगर बाजार समितीत शिवाजी कर्डीले यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता आली. मात्र, राहुरी बाजार समितीची सत्ता ही गेल्या 15 वर्षापांसून एकाच माणसाकडे आहे. उमेदवार, मतदार तेच ठरवतात. आम्ही तेथे प्रयत्न केला, आम्हाला तेथे दोन जागा मिळाल्या आहेत. पारनेर बाजार समितीत आजी-माजी आमदार बरोबर लढले. तरीही तेथे आम्हाला जवळपास 45 टक्के मत मिळालं, असं त्यांनी सांगितलं.
कर्जत बाजार समितीत 9-9 जागा दोन्ही गटाला मिळाल्या आहेत. त्यामुळे सभापती कुणाचा होणार? या प्रश्नावर बोलताना सुजय विखे पाटील म्हणाले, "कर्जत बाजार समितीत सभापती हा भाजपचाच होणार", असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
दरम्यान, कर्जत बाजार समितीच्या निवडणुकीत राम शिंदे आणि रोहित पवार यांच्या गटात काटे की टक्कर पाहायला मिळाली. आता पुन्हा एकदा सभापती कुणाचा होणार? यासाठी दोन्ही आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागणार असून यात कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लगालं आहे.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.