

Dipali Patil death case : जामखेडमधील नृत्यांगना दीपाली पाटील मृत्यू प्रकरणातील आरोपी माजी नगरसेवक संदीप गायकवाड हा नेमका कोणत्या पक्षाचा यावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात वाॅर सुरू झाला आहे.
आमदार रोहित पवार यांनी संदीप गायकवाड याची पत्नीने भाजपकडून उमेदवारी केल्याचा दावा केला. यावर आता भाजपने पलटवार केला आहे. भाजपचे जामखेडमधील बाजार समितीचे सभापती शरद कार्ले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
भाजपचे (BJP) शरद कार्ले यांनी म्हटलं आहे की, संदीप गायकवाड हा 2016 साली राष्ट्रवादीकडून निवडून आला होता. 2019च्या विधानसभा निवडणुकीत तो रोहित पवारांसोबत होता. त्यानंतर 2024 विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. तेव्हापासून तो राष्ट्रवादीतच आहेत. त्यांचा भाजपशी दूरपर्यंत संबंध नाही. गायकवाड याची पत्नी नगरपरिषद निवडणुकीत ऐनवेळी भाजपकडून निवडणूक लढवली असली, तरी संदीप गायकवाड याचा भाजपमध्ये कुठलाही राजकीय प्रवेश झालेला नाही. ते आजही राष्ट्रवादीतच आहेत. नगरपरिषद निवडणुकीत पराभव होणार हे स्पष्ट होताच, रोहित पवारांनी भाजपला व आमच्या नेत्याला बदनाम करण्याचे षडयंत्र हाती घेतले आहे, असा गंभीर आरोप केला आहे.
नृत्यांगणा दिपाली पाटील यांच्या मृत्यूची घटना दुर्दैवी असून, या घटनेच्या आडून रोहित पवार (Rohit Pawar) हे घाणेरडे राजकारण करून जामखेडची बदनामी करू पाहत आहेत. नृत्यांगणा दिपाली पाटील यांनी चार डिसेंबरला जामखेड इथल्या लाॅजवर गळफास घेतला. ही घटना उजेडात येताच आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या घटनेशी भाजपशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला. आता भाजपने रोहित पवारांचीच पोलखोल केली आहे.
शरद कार्ले म्हणाले, "माजी नगरसेवक संदीप सुरेश गायकवाड याने 2016सालच्या जामखेड नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग 10 मधून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली. ती जिंकली देखील होती. त्याच्या पत्नीही त्यावेळी प्रभाग 7 मधून निवडून आल्या होत्या. 2019च्या विधानसभा निवडणुकीत संदीप गायकवाड हा रोहित पवारांसोबत होते. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर संदीप गायकवाड याने 2024विधानसभा निवडणुकीच्या काळात जेष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यावेळी गायकवाड याने रोहित पवारांचा जोरदार प्रचार केला होता."
"जामखेड नगरपरिषद निवडणुकीत रोहित पवार यांनी संदीप गायकवाड याला उमेदवारी डावलली. गायकवाड याच्या पत्नीने बंडखोरी करत ऐनवेळी भाजपकडून उमेदवारी केली. मात्र संदीप गायकवाड याने भाजपमध्ये प्रवेश केला नाही. एकाच कुटुंबातील अनेक जण वेगवेगळ्या पक्षात सक्रीय असतात. एखाद्याने काही चुकीचं केलं, तर त्याचा संबंध कुटुंबातील व्यक्ती आणि त्यांच्या पक्षाशी जोडणे म्हणजे बालबुध्दी उपद्व्याप होय, हाच उद्योग सध्या रोहित पवारांकडून सुरू आहे," असा घणाघातही शरद कार्ले यांनी केला.
"माजी नगरसेवक संदीप गायकवाड हा आमदार रोहित पवार यांचा कार्यकर्ते असल्याचे पुरावे सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. रोहित पवार यांनीच शरद पवारांच्या उपस्थितीत गायकवाड याचा पक्षात जोरदार स्वागत केलं होतं. भाजपवर टीका करण्यापूर्वी रोहित पवारांनी स्वता:चे आत्मपरीक्षण करावे. संदीप गायकवाड प्रकरणी रोहित पवारांनी भाजपवर केलेले आरोप निरर्थक आणि बिनबुडाचे आहेत, या प्रकरणात रोहित पवार हे अडचणीत येणार असे दिसताच त्यांनी भाजपवर आरोप करून कांगावा करण्याचा प्रयत्न केला, असेही शरद कार्ले यांनी म्हटले.
वास्तविक सत्य हेच आहे की, संदीप गायकवाड हाच त्यांचा पक्षाचा आणि त्यांचा कार्यकर्ता आहे. जामखेड नगरपरिषद निवडणुकीत दारूण पराभव होणार हे समजल्यामुळे रोहित पवारांनी भाजप व आमच्या नेत्याची बदनामी सुरू केली आहे. भाजपला बदनाम करण्याचे रोहित पवारांनी हाती घेतलेले षडयंत्र जामखेडची जनता कदापि सहन करणार नाही, असा इशारा शरद कार्ले यांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.