Malegaon Blast Case: वादग्रस्त साध्वी प्रज्ञासिंग यांच्यावर शिक्षेची टांगती तलवार कायमच, मालेगाव स्फोट सुनावणी पुन्हा लांबणीवर!
Sadhvi Pradnya Singh News: मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल आज जाहीर होणार होता. त्यासाठी वादग्रस्त साध्वी प्रज्ञासिंग यांसह सर्व संशयीत आरोपी न्यायालयात आज उपस्थित होते. मात्र आज ही सुनावणी पुन्हा टळली. त्यामुळे खटल्याचा निकाल लांबला.
मालेगाव कब्रस्तानातील मशिदीत सायकल आणि बाईकमध्ये स्फोटकांच्या साह्याने स्फोट घडवून आणला होता. २००८ मधील या स्फोटाच्या खटल्याचा निकाल आज जाहीर होणार होता. मात्र राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) मुंबई उच्च न्यायालयात कालावधी वाढवून मिळावा अशी विनंती केली. त्यामुळे हा निकाल आता 31 जुलै रोजी जाहीर होणार आहे.
विशेष न्यायालयाच्या आदेशानुसार या खटल्यातील संशयित भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंग आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांसह सर्व प्रमुख १२ आरोपी आज न्यायालयात उपस्थित होते. न्यायालयाची सुनावणी आणि सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्यामुळे केवळ निकाल जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र आता हा निकाल पुन्हा लांबणीवर पडला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंग आणि कर्नल प्रसाद पुरोहित हे या कटातील मुख्य संशयित आरोपी आहेत. या खटल्याकडे राजकीय आणि अन्य संस्थांचे लक्ष लागले होते. साध्वी आणि पुरोहित यांना संशयाचा फायदा देत निर्दोष सोडले जाते की शिक्षा होते याची उत्सुकता आता कायम राहिली आहे.
मालेगाव येथील रसूल कब्रस्तान येथे असलेल्या मशिदीत हा स्फोट घडवून आणला होता. सायकली आणि मोपेड गाडीमध्ये स्फोटके भरण्यात आली होती. त्यात सहा जणांचा मृत्यू झाला. शंभरहून अधिक नागरिक जखमी झाले होते. या बाबतीत धार्मिक विद्वेष पसरविणे, दहशतवादी कट रचने, हत्या घडविणे असे आरोप ठेवण्यात आले होते.
काय आहे प्रकरण?
मालेगाव येथील मशिदीत २९ सप्टेंबर २००८ रोजी हा स्फोट घडविण्यात आला. त्याचा तपास प्रारंभी दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपविण्यात आला. दुकाने केलेल्या तपासात स्फोटासाठी वापरलेली बाईक साध्वी प्रज्ञासिंग यांच्या नावे नोंदणीकृत असल्याचे आढळले. अन्य पुरावे व स्फोटके तयार करण्यासाठी वापरलेली रसायने या संशयातून कर्नल पुरोहित यांच्यावर संशय निर्माण झाला. त्यात साध्वी प्रज्ञासिंग, शिवनारायण कलसांगरी आणि शाम साहू यांना मुंबईतून अटक करण्यात आली होती.
या प्रकरणाचा तपास २००१ मध्ये राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NIA) सोपविण्यात आला. संस्थेने आपल्या तपासानंतर साध्वी प्रज्ञासिंग हिला क्लीन चीट दिली होती. मात्र न्यायालयात त्यावर आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे आरोप पत्रातून साध्वी प्रज्ञासिंग आणि कर्नल पुरोहित यांची नावे कायम ठेवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर येत्या 31 जुलैला न्यायालय प्रज्ञासिंग आणि पुरोहित यांना दोषी ठरवते की सोडून देते याची उत्सुकता आहे.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.