

BJP Mahayuti government Maharashtra : पार्थ अजित पवार भागीदार असलेल्या कंपनीच्या पुण्यातील जमीन खरेदी व्यवहार रद्द झाला असला, तरी सरकारी जमिनीशी हा व्यवहार झाला. या जमीन व्यवहाराला आता खूप जुनी पार्श्वभूमी असल्याचं आता समोर येऊ लागलं आहे.
काँग्रेस नेते तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या व्यवहारावर भाष्य करताना, खळबळजनक दावा केला आहे. 'महसूलमंत्री असताना, माझ्याकडे या जमिनीशी संबंधित तीन वेळा फाईल आली होती. परंतु मी तिन्ही वेळस नाकारली. विद्यमान जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महायुतीत त्यावेळी महसूलमंत्री असताना, त्यांच्या कार्यकाळात काय झाले, त्यांना विचारा,' असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत, अमोडिया कंपनीचा हा जमीन व्यवहार रद्द करण्यात येत असल्याची घोषणा केली. पुण्यातील (Pune) कोरेगाव पार्क इथल्या परिसरातील 40 एकर जागेचा हा व्यवहार होता. ही जमीन महार वतनाची होती. महार वतनाची जमीन जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय विकता येत नाही. कागदावर ही जमीन सरकारच्या मालकीची आहे.
असे असताना या जमीन खरेदी-विक्रीचा व्यवहार झाल्याने अन् ती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीशी निगडीत व्यवहार असल्याने राज्यात एकच गदारोळ झाला. विरोधकांनी महायुती सरकारच्या कारभारावर जोरदार टीका करत थेट अजितदादांच्या राजीनाम्याची मागणी केली. या राजकीय व्यवहारावर अजूनही पडसाद उमटत आहेत. या सर्व प्रकरणावर माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले, "महाविकास आघाडी सरकारच्या काळात मी महसूलमंत्री असताना, माझ्याकडे तीन वेळेस फाईल येऊन गेली, मी तिन्ही वेळेस नाकारली. सरकारी जमिनीला कुणीच वाली नाही, असं म्हटलं जातं, आता या व्यवहारानं त्याचा प्रत्यय आला. काही लोक त्या जमिनींवर डोळा ठेवून ती गिळण्याचा प्रयत्न करत असतात. फाईल घेऊन फिरणारे देखील काही एजंट असतात. आपल्या हातून चुकीचे काही घडू नये याची काळजी मी घेतली."
'मी महसूलमंत्री असताना अनुकूलता दाखवली नाही, माझ्या नंतर काय झालं माहीत नाही. विखे पाटलांच्या कार्यकाळात काय झालं हे त्यांना विचारा, असे सांगताना पुण्यात जैन समाजाची जागा गिळण्याचा प्रयत्न झाला. अहिल्यानगरमध्ये जैन समाजाच्या जागेच्या बाबतीत असंच काहीतरी घडलंय. लोकांनी अशा गोष्टींवर लक्ष ठेवले पाहिजे,' असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.
'एवढ्या मोठ्या व्यवहारात भाजप महायुती सरकारने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनभावना लक्षात घेतली पाहिजे होती, असे सांगताना, काँग्रेस काळातील प्रकरणांची दाखले दिली. आरोप झाल्यावर काँग्रेसच्या कार्यकाळात अनेक नेत्यांवर कारवाई झाली,' याकडे बाळासाहेब थोरातांनी लक्ष वेधले.
'सासूला फक्त फ्लॅट दिला म्हणून अशोक चव्हाणांचा राजीनामा झाला. मुलीला पास होण्यासाठी मदत केल्याच्या शंकेवरून निलंगेकरांचा राजीनामा झाला. विलासराव देशमुख यांना ताज प्रकरणावेळी पाहणी करायला गेले, राजीनामा झाला. जनभावना महत्वाची मानून काँग्रेसने आपल्या कार्यकाळात कारवाई केल्या. आता भाजपने ठरवलं पाहिजे, कसं वागायचं? जनता यांच्या अशा प्रकारांना वैतागली आहे, 'असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.