Sarkarnama Analysis Dindori Loksabha : निवडणूक लोकसभेची! परीक्षा मात्र अनिल कदम अन् दिलीप बनकरांच्या वर्चस्वाची

Loksabha Election 2024 : मतदारांनी दिलेल्या प्रतिक्रिया विचारात घेतल्यास या दोन्ही नेत्यांचे भवितव्य आत्ताच स्पष्ट झाले आहे. एका अर्थाने दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक आमदार बनकर यांना विधानसभेसाठी गोत्यात आणणार अशी भीती देखील आहे.
Sarkarnama Analysis Dindori Loksabha
Sarkarnama Analysis Dindori LoksabhaSarkarnama

Niphad lok Sabha Election News: दिंडोरी लोकसभा मतदारसंघात यंदा सर्व राजकारण आणि प्रचार निफाड केंद्रीत होता. भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे यांच्यात ही लढत अतिशय चुरशीची झाली.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा (Dindori Constituency) यंदाचा प्रचार आणि राजकारण शेवटच्या टप्प्यात निफाड केंद्रीत झाले होते. निफाड मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल कदम यांनी ही निवडणूक अतिशय मनावर घेतली होती. त्यामुळे अजित पवार गटाचे आमदार दिलीप बनकर (Dilip Bankar) यांनाही प्रचारात सक्रिय होणे भाग पडले. या दोघांनीही सोशल मीडियावर अतिशय कल्पक प्रचार केला. या प्रचाराला मतदारांनी दिलेल्या प्रतिक्रिया विचारात घेतल्यास या दोन्ही नेत्यांचे भवितव्य आत्ताच स्पष्ट झाले आहे. एका अर्थाने दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक आमदार बनकर यांना विधानसभेसाठी गोत्यात आणणार अशी भीती देखील आहे.

या निवडणुकीत डॉ भारती पवार (Dr. Bharati Pawar) या सर्व परिचित उमेदवार होत्या. मात्र कांदा निर्यात प्रश्नाने त्यांना त्रस्त केले. कांदा निर्यातीच्या निमित्ताने द्राक्ष, सोयाबीन, गहू, भाजीपाला असे असंख्य प्रश्न या निमित्ताने शेतकऱ्यांची भळभळती जखम झाली होती. त्या जखमेला निवडणुकीच्या महिन्याभराच्या कालावधीत औषध देऊन बरे करणे, निष्णांत डॉक्टरांच्या देखील क्षमते बाहेरचे होते. निफाडच्या प्रचारातही तेच घडले. त्यामुळे अतिशय नवख्या, अपरिचित भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांना शरद पवार या नावाने तारले. शेतकऱ्यांनी त्या नावामुळेच भागरे यांच्या पदरात भरभरून मते दिल्याचे वातावरण निर्माण झाले.

Sarkarnama Analysis Dindori Loksabha
Bhaskar Bhagare Politics : निकालाआधीच राष्ट्रवादीच्या भास्कर भगरे यांच्यावर अपेक्षांचे ओझे !

या विधानसभा मतदारसंघात पिंपळगाव बसवंत, ओझर, सुकेने, चांदोरी, सायखेडा या मोठ्या गावात भाजपला (BJP) मतदान झाल्याचे दिसले. हाच कल ड्रायपोर्ट असलेल्या पिंपळस आणि भाऊसाहेब नगर येथेही दिसून आला. शेवटच्या टप्प्यात झालेली पंकजा मुंडे यांची सभा गंगा काठच्या गावांमध्ये वातावरण बदलून गेली. जिथे बुथवर कार्यकर्ते मिळणे अवघड होते. तिथे भाजपच्या बुथवर मुंडे समर्थक दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सभा देखील निफाडमध्ये मतदानामध्ये किती परावर्तित होतात, हे निकालातून दिसेल. एकंदर शेवटच्या ४ ते ५ दिवसात भाजपने ग्राउंड रियालिटी लक्षात आल्यावर जी यंत्रणा व तंत्र वापरले ते कौतुकास्पद होते. या कालावधीत महत्त्वाच्या पदाधिकार्‍यांच्या खिशापर्यंत भाजप पोहोचला होता. अर्थात त्याचा प्रभाव मतदारांचा कल बदलण्यात किती यशस्वी होईल? याबाबत साशंकता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निफाड विधानसभा मतदारसंघ (Vidhan sabha Constituency) हा शेतकरी बहुल आणि शरद पवार यांना मानणाऱ्या वर्ग असलेला आहे. येथील कांदा, द्राक्ष, भाजीपाला या पिकांच्या शेतीसाठी पवार नेहमीच मदतीला आले आहेत. त्याचा परिणाम काही प्रमाणात मतदानातही दिसतो. मात्र गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत भाजपने येथून आघाडी घेतली आहे. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत भारती पवार यांना 93 हजार 763 तर राष्ट्रवादीच्या धनराज महाले यांना 58 हजार 19 मते मिळाली होती. भाजपच्या पवार 35 हजार 744 मतांनी आघाडीवर होत्या. यंदा तसे चित्र निश्चितच नव्हते. त्यामुळे ही आघाडी टिकवण्यासाठी डॉ पवार यांना खूप परिश्रम घ्यावे लागले. आमदार दिलीप बनकर, सतीश मोरे, यतीन कदम, बापू पाटील, अनिल कुंदे, सिद्धार्थ वनारसे, राजेंद्र सोनवणे यांच्याबरोबरच शिवसेनेच्या कदम यांचे सहकारी असलेल्या गोकुळ गीते यांनीही शरीराने नव्हे मात्र मनाने डॉक्टर पवार यांनाच साथ दिली, असे बोलले जाते.

महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) भगरे यांच्या प्रचाराची जबाबदारी माजी आमदार अनिल कदम यांनी अतिशय कार्यक्षमपणे पार पाडली. एका दृष्टीने आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणूनच त्याकडे पाहिले जाते. अजित पवार गटाचे आमदार दिलीप बनकर हे शरद पवार यांच्या विश्वासू. मात्र ते सध्या बाजूला पडले आहेत. माजी आमदार कदम हे शरद पवार यांच्या अतिशय जवळ गेले आहेत. महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. आता आमदार कदम यांच्याबरोबरीने भास्करराव बनकर, बाळासाहेब जाधव, दीपक शिरसाठ, सुधीर कराड, राजेश पाटील, विक्रम रंधवे असे अनेक पदाधिकारी सक्रिय होते. त्यामुळे निवडणूक लोकसभेची मात्र रंगीत तालीम दिलीप बनकर आणि अनिल कदम यांच्या विधानसभा निवडणुकीची असे चित्र होते.

Sarkarnama Analysis Dindori Loksabha
Eknath Khadse News : एकनाथ खडसेंचा प्रवास सक्तीच्या राजकीय निवृत्तीकडे? पक्षप्रवेशासाठी ताटकळले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com