Maharashtra Politics Latest News : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यस्तरीय अधिवेशनातून भाजपच्या फॅसिझम विचारांवर घाणाघात करीत लोकसभेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले. शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार मानणारे आपण आहोत. परंतु त्यांच्याकडे शाहू, फुले, आंबेडकर ही भूमिका आणि विचार त्यांच्या मनातदेखील दिसत नाही. दिसते काय, तर गाय, गोमूत्र व लोळकर! या लोकांची विचारधारा आणि त्यांचे कार्यक्रम याला महत्त्व देण्याची भूमिका घेतली जात आहे. याचे प्रमुख कारण काय, तर हिंदुस्थानावर फॅसिझम आणण्याचा प्रयत्न या सर्वांचा आहे. यासाठी राबवल्या जात असलेल्या पाचकलमी कार्यक्रमांकडे शरद पवार यांनी देशातील जनतेचे लक्ष वेधले.
शरद पवार यांनी भाजपच्या पाचकलमी कार्यक्रम सांगितले. "सर्व क्षेत्रांचे खासगीकरण आणि अनिर्बंध नफेखोरीला प्रोत्साहन, खोट्या प्रचारातून मुस्लिम समाजाविषयी द्वेष वाढवणे आणि धार्मिक ध्रुवीकरण करणे, न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग, ईव्ही, सीबीआय, प्रसारमाध्यमे, एअरलाईन्स अशा सगळ्या स्वायस्त संस्थेवर कब्जा करणे आणि मनुवादी वर्चस्ववाद वाढवणे आणि धर्माच्या नावाखाली देश चालवणे, आक्रमक राष्ट्रवादाचा यात समावेश आहे." या आक्रमक राष्ट्रवादात मुख्यतः पाकिस्तानविरोधात आक्रमकता दाखवायची. त्यानिमित्ताने जनतेत आणि देशात वेगळी वातावरणनिर्मिती केली जात आहे. हा देशात फॅसिझमला प्रोत्साहन देणारा पाचकलमी कार्यक्रम राबवून इतर मुद्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे,' असा आरोप Sharad Pawar यांनी केला.
'महिला सर्वाधिक असुरक्षित'
मोदींच्या राज्यात महिला सर्वाधिक असुरक्षित झाल्या आहेत. शरमेने मान खाली घालाव्या लागतील, अशा घटना देशात घडल्या आहे. मणिपूर येथील आदिवासी महिलेबरोबर झालेली घटना त्यातील एक आहे. देशाची राष्ट्रपती महिला आहे. आनंद आणि अभिमान आहे. त्या पदाचा सन्मान कितपत होता, हेदेखील चिंतनाचा विषय आहे. लोकसभेच्या नवीन संसद इमारत बांधली गेली. जुनी असतानादेखील नवीन इमारत बांधली गेली. लोकसभेचे पहिले सेशन राष्ट्रपतीच्या अभिभाषणाने सुरू होते. असे असतानादेखील नवीन संसदेच्या इमारतीला राष्ट्रपतींना उद्घाटनासाठी बोलवले गेले नाही. त्यांचा सन्मान केला गेला नाही. नवीन कायदे केले आहेत, महिला अधिकाधिक अधिकार आणि नोकरी देण्याची शाश्वती दिली गेली आहे. ती करताना त्यांची अंमलबजावणी २०२९-३० नंतर केली जाणार आहे. याची अंमलबजावणी चार वर्षे होणार नाही. याचाच अर्थ भाजप सरकारची महिलांविषयी बांधिलकी किती आहे, हे दिसून येते, असेही शरद पवार म्हणाले.
'मोदी ही खोटी मांडणी'
शहरीकरणाचे प्रश्न गंभीर आहे. यातून अनेक समस्या उद्भवल्या आहेत. यासाठी अधिक भांडवली गुंतवणुकीची तयारी राज्यकर्त्यांची नाही. याचा परिणाम दिवसेंदिवस शहरीकरणाचे प्रश्न गुंतागुंतीचे होऊ लागले आहे. हे सर्व प्रश्न सत्ताधाऱ्यांशी निगडित आहे. आमचे काही सहकारी आजही बोलतात. यात बदल करायचा असेल, तर एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे मोदी. मोदीशिवाय पर्याय नाही. परंतु ही खोटी मांडणी आहे, असे ते म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
'दाखवा तुमचा प्रधानमंत्री!'
विरोधक एकत्र झाल्यावर नेहमीच विचारले जाते की, तुमचा प्रधानमंत्री कोण? तुम्ही याची चिंता करू नका. आणीबाणीनंतर निवडणुका झाल्या, त्यावेळी जयप्रकाश यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी विरोधकांनी पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता. निवडणूक झाली. त्यानंतर पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला. मोरारजी देसाई यांची निवड झाली. भाजपकडून विरोधकांकडे पंतप्रधानपदाचा चेहराच नाही. ते देश चालवूच शकत नाहीत, असा जो प्रचार केला जात आहे, तो फसवा आहे. मोदी ही खोटी मांडणी असून, त्याला सक्षम पर्याय म्हणून महाविकास आघाडी इंडिया आहे, असा दावा शरद पवार यांनी केला.
'यंत्रणेचा गैरवापर चिंताजनक'
ईडी, सीबीआय अशा यंत्रणेचा उपयोग विरोधी पक्षांच्याविरोधात केला जातो. अनिल देशमुख, संजय राऊत यांच्याविरोधात या यंत्रणा तोंडघशी पडल्या आहेत. दिल्लीत गेली दहा वर्षे अरविंद केजरीवाल यांची सत्ता आहे. त्यांच्याभोवतीदेखील अडचणी वाढवल्या जात आहेत. नोटिसा पाठवल्या जात आहेत. साधा, स्वच्छ माणूस आहे. त्यांना आज किंवा उद्या अटक झाल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका. सत्तेचा गैरवापर केला जात आहे. आमच्या विचारांशी सुसंगत भूमिका घेत नाही, म्हणून विरोधकांवर कारवाई होत आहे. मोदींना पर्याय आहे. विरोधक एकत्र येत आहेत. याला आता जनतेचे बळदेखील मिळत आहे. येत्या १५ दिवसांत महत्त्वाची बैठक होऊन लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय होईल. महाविकास आघाडी इंडियात वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनादेखील सहभागी करून घेणार असल्याचे शरद पवार यांनी यावेळी जाहीर केली.
edited by sachin fulpagare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.