Sharad Pawar : मतांच्या प्रश्नावर जे चालू आहे त्यावर निवडणूक आयोग स्वच्छ भूमिका घेत नाही. मतदार यादीबाबत आमचा अभ्यास सुरू आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार जितेंद्र आव्हाड हेही उपस्थित होते. या सर्वांनीही निवडणूक आयोगावर मतदार याद्या मॅनेज आहेत, प्रभागरचना सरकारपुरस्कृत आहे, सत्ताधारी नेत्यांच्या घरी बसून प्रगाररचना करण्यात आली, आरोप करत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या सुरात सूर मिसळला.
आम्ही सरकारचा विचार करत नाही. आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाचा विचार करतो. गेल्या आठवड्यात वोट चोरी विरोधात 300 खासदारांनी निवडणूक आयोगावर मोर्चा काढला. पण तिथे आम्हाला अटक केली गेली अशी टीका पवारांनी केली. दरम्यान त्यांनी बिहार निवडणुकीबाबत देखील भाष्य केलं. म्हणाले, आज राहुल गांधीचा बिहार मध्ये मोर्चा सुरु आहे. राहुल गांधीच्या मोर्चाला बिहार मध्ये मोठा प्रतिसाद मिळतो आहे. बिहार राज्य हे आर्थिक दृष्ट्या अडचणीचं राज्य आहे हे आपण नेहमी ऐकतो परंतु बिहार हे राजकीय दृष्टया अत्यंत जागृत आहे असं पवार म्हणाले.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस यांचा फोन :
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला काल फोन केला. त्यांनी उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सी.पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे आहेत त्यामुळे त्यांना मतदान करा अशी विनंती केली. परंतु मी त्यांना ते शक्य नाही असं सांगितलं. कारण ते आमच्या विचाराचे नाहीत. आम्ही आमचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. असं आपण त्यांना सांगितल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.
त्याहीपेक्षा राधाकृष्णन झारखंडचे राज्यपाल असताना झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना एका प्रकरणात अटक करण्यात आली होती. सोरेन यांना राजभवनात राज्यपालांच्या समोर अटक केली. सोरेन यांनी विनंती केली की मला राजभवनात अटक करु नका, दुसरीकडे कुठे करा मी येतो. पण तरीही त्यांचं न ऐकता त्यांना अटक केली. सत्तेचा चुकीचा वापर कसा केला जातो हे त्याचं उदाहण आहे असं शरद पवार म्हणाले.
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आमची मतं कमी आहेत. पण आम्ही त्याची चिंता करत नाही आणि आम्ही नसते उद्योग करणार नाही असही पवार म्हणाले. उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीए आणि इंडिया आघाडी दोघांकडूनही उमेदवार देण्यात आले आहेत. पण राधाकृष्णन यांना मतदान करता येणार नाही असेही स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.