Rahuri News : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसनं उमेदवार दिल्यानंतर बिनविरोधची शक्यता मावळली होती. पण त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार,शरद पवार, सुप्रिया सुळे,रोहित पवार यांनी पडद्यामागं जोरदार सूत्रं फिरवल्यानंतर काँग्रेसनं अखेर उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. याचदरम्यान, बारामतीनंतर राहुरी पोटनिवडणुकीतही अक्षय कर्डिले यांच्याविरोधातील उमेदवारी मागे घेण्यासाठी भाजपच्या बड्या नेत्यानं थेट शरद पवारांनाच गळ घातल्याचं समोर आलं आहे.
बारामती, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा गुरुवारी(ता.9 एप्रिल) मुदत संपणार आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.बारामतीत काँग्रेसनं आकाश मोरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर तिथे निवडणूक बिनविरोध होणार असल्याची चर्चा रंगली असतानाच राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपचे मंत्री आणि वजनदार नेते राधाकृष्ण विखे पाटील मैदानात उतरल्याचं दिसून आलं. पण विखे पाटलांनाही महाविकास आघाडी अन् शरद पवारांचं मन वळवण्यात अपयश आलं.त्यामुळे फडणवीसांनी बारामतीत वापरलेला पॅटर्न राहुरीत फसल्याचंच स्पष्ट झालं आहे. त्यामुळे राहुरीत पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
राज्याचे जलसंपदामंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहुरी पोटनिवडणुकीबाबतमोठं भाष्य केलं आहे. ते म्हणाले,'शरद पवार यांना देखील माझी विनंती आहे की, जी भूमिका बारामती मतदारसंघात घेतली, तीच भूमिका राहुरी मतदारसंघात घ्या. म्हणजे निवडणुकीला चांगलं स्वरूप येईल. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी त्या भूमिकेतूनच निवडणुकीतून माघार घेतल्याचंही विखे यांनी पवारांना सांगितलं.
तसेच राहुरी विधानसभेसाठी महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षानंही अर्ज भरला आहे. काही इच्छुकांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. त्यांनाही विखे पाटलांनी माघार घेण्यासाठी विनंती केली आहे.
विखे पाटील म्हणाले, अजितदादांच्या निधनानंतर बारामती मतदारसंघात काँग्रेसनं उमेदवार दिला होता,पण त्यांनी नंतर माघार घेतली. कारण अजितदादांच्या निधनानंतरच तो प्रश्न तयार झालाय. राहुरीतही शिवाजी कर्डिलेंच्या निधनानंतर असाच प्रश्न तयार झाला. याठिकाणीही राष्ट्रीय पक्षानं बारामतीसारखीच भूमिका घ्यावी, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं.
आमदार शिवाजी कर्डिले यांचे निधन झाल्याने निवडणूक आयोगाने राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर केली आहे. 23 एप्रिलला या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. दरम्यान, भाजपने राहुरी पोटनिवडणुकीसाठी शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर केली आहे. अक्षय कर्डिलेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत अर्ज न भरण्याचा जाहीर केल्यानंतर, ते त्यांची ताकद त्यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी, भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांच्यामागे ताकद उभी करणार का? या प्रश्नानं राहुरीत जोर धरला आहे. राहुरीमध्ये तनपुरेंची ताकद मोठी आहे. तसंच तनपुरे पहिल्यापासून हे दोन्ही राष्ट्रवादीच्या जवळ राहिले आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे गोविंद मोकाटे यांनी निवडणुकीसाठी अपक्ष अर्ज दाखल केला असून, गेल्या तीन ते चार महिन्यांपासून सक्रिय आहेत. तनपुरे निवडणूक लढवत नसतील, तर ते त्यांची ताकद कोणामागे उभी करणार, असा प्रश्न चर्चेत आला आहे. विशेष करून तनपुरेंच्या कार्यकर्त्यांची अवस्था संभ्रमात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे राहुरी पोटनिवडणुकीवर म्हणाले,' बारामती पोटनिवडणुकीसाठी आमच्या पक्षाने न लढविण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आम्ही याठिकाणी उमेदवार दिलेला नाही. त्याशिवाय याठिकाणी काँग्रेसचा उमेदवार असला तरी आम्ही आमच्या निर्णयावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. त्याशिवाय राहुरीची पोटनिवडणूक होणारच असल्याचे त्यांनी सांगत या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार गोविंदराव मोकाटे यांची उमेदवारी कायम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.