Ahmednagar News : वारंवार शासनाच्या दुग्ध विकास विभागाने बैठका घेत आणि शासन आदेश काढूनही दूध कंपन्या आणि शासकीय दूध संघ दुधाला 34 रुपये भाव न देता 27 रुपयांनी दूध संकलन करत असल्याच्या निषेधार्थ दूध उत्पादक शेतकऱ्यांनी राज्यभर आंदोलने सुरू केली आहेत. अकोले इथे दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती तसेच किसान सभा यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषण आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची तीव्रता वाढत चालली असून, आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दूध दरवाढ आंदोलनाला पाठिंबा कळवला आहे.
सुरू असलेल्या आंदोलनाबाबत शरद पवार यांनी किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे यांच्याशी चर्चा करून दूध दरवाढ आंदोलनाला लेखी पाठिंबा कळवला आहे. गेल्या काही दिवसांपासून दूध दराच्या प्रश्नावर डॉ. अजित नवले व इतर कार्यकर्त्यांनी बेमुदत उपोषण सुरू आहे. महाराष्ट्र शासनाने दिनांक 14 जुलै 2023 रोजी अध्यादेश काढून गाईच्या दुधाला किमान 34 रुपये प्रतिलिटर निश्चित करून ही सदर आदेशाचे पालन दूध संघांकडून होत नाही असे दिसते. या संदर्भात शासनाने तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे. दूध संघानेही सहकार्य करावे, असे म्हटले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
खासदार सुप्रिया सुळे यांनीही एक ट्विट करत सरकार उपोषण आंदोलनाकडे दुर्लक्ष करून दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचे म्हटले आहे. आज मंगळवारी अकोले इथे येत अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी आपण गेल्या 8 वर्षांत शेतकऱ्यांसोबत केलेल्या कामातून शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्या आहेत. त्यामुळे दुधाला रास्त भाव मिळायला हवा. शेतकरी काही परग्रहावरून आलेला नाही. बाजारात दूध 45 ते 48 रुपये दराने मिळते, मग दूध उत्पादक शेतकऱ्याला 27 रुपये भाव देऊन अन्याय होता कामा नये. आपण सदैव शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी वैयक्तिक सोबत असल्याची ग्वाही उपोषणकर्त्यांना दिली.
अकोले इथे सुरू असलेल्या उपोषण आंदोलनाचा आज 6 वा दिवस आहे. संदीप दराडे, अंकुश शेटे यांच्यासह किसान सभेचे डॉ. अजित नवले स्वतःही उपोषणाला बसले आहेत. आज आंदोलनाच्या 6 व्या दिवशी शेकडो जनावरे तहसील कार्यालयात सोडून आंदोलक दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दुधाला 34 रुपये भाव मिळावा म्हणून घोषणाबाजी केली. दूध उत्पादक शेतकरी आज राज्यभर तहसील कार्यालयासमोर आंदोलने करत असून, साखळी उपोषणे सुरू असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
Edited By Sachin Fulpagare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.