Sharad Pawar and Loksabha Election 2024 : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आगामी निवडणुकीत मतदारांचा कल विरोधी पक्षांना अनुकूल दिसतो आहे. भाजपच्या कामकाजावर शेतकरी, मध्यमवर्गीय आणि अन्य मतदार नाराज आहेत. तसा कल विविध भागात दिसून येत आहे. त्याचा फटका भाजपला बसेल, असा दावा त्यांनी केला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार(Sharad Pawar) यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटप तसेच अन्य प्रक्रियांविषयी माहिती दिली. ते म्हणाले, लवकरच आचारसंहिता जाहीर होणार आहे. निवडणुकीसाठी अतिशय कमी वेळ उरला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी जागावाटप तसेच अन्य प्रक्रियेबाबत चर्चा पूर्ण केली आहे. सध्या केवळ वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशी काही मुद्द्यांवर चर्चा होणे आहे. लवकरच त्यांच्याशी चर्चा करून जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर केला जाईल.
प्रकाश आंबेडकर यांनी किती जागा मागितल्या, या प्रश्नाचे उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. ते म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांनी निश्चित अशा जागा मागितलेल्या नाहीत. त्यांनी 16 मतदारसंघांची एक यादी दिली आहे. तिथे वंचित बहुजन आघाडीचे काम आहे असे त्यांचे म्हणणे आहे. त्याबाबत प्रत्यक्ष त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. चार किंवा पाच जागा देण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच यावर निर्णय होऊ शकेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
कालावधी कमी असल्याने शिवसेना उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) गट, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने यापूर्वीच निवडणुकीसाठी प्रचार दौरे सुरू केले आहेत. रोज विविध भागात असे दौरे आणि कार्यक्रम होत आहेत.
शरद पवार म्हणाले, मतदारांचा मूड विरोधी पक्षांना अनुकूल दिसतो आहे. राज्यात नाशिक, सातारा, पुणे, धुळे यांसह विविध जिल्ह्यांत कांदा उत्पादक शेतकरी अतिशय त्रस्त आहे. निर्यातबंदी करून शासनाने त्यांची कोंडी केली आहे. ऊस उत्पादकांनाही अनेक अडचणी आहेत. इथेनॉल निर्मितीबाबत केंद्राचे धोरण धरसोडीचे आहे.
तसेच, शेतीच्या अन्य शेतमालाचे भाव कोसळलेले आहेत. त्यामुळे शेतकरी भाजपला याबाबत जाब विचारत आहे. महागाई, बेरोजगारी आदी समस्यांमुळे मध्यमवर्गीयदेखील त्रस्त झालेला दिसतो. या सगळ्यांचे परिणाम येत्या निवडणुकीत दिसून येतील. सत्ताधाऱ्यांना त्याचा मोठा फटका बसेल, असा दावा पवार यांनी केला.
सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडे(BJP) त्यांनी काय काम केले, याबाबत सांगण्यासारखे काहीही नाही. त्यामुळे ते विरोधी पक्षांवर हल्ले करीत आहेत. तपास यंत्रणांचा दुरुपयोग करून त्यांना त्रास देत आहेत. मतदारांनी भाजपला या विषयांवर जाब विचारल्याचे दिसून येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत त्याचे पडसाद उमटलेले दिसतील, असे पवार म्हणाले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.