Political News : सरकारकडून ईडी, सीबीआय या यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे. ईडी केवळ विरोधी पक्षासाठी वापरली जात आहे. राज्यातील विविध नेत्यांवर ईडी आकसापोटी कारवाई करीत आहे. तपास यंत्रणाकडून राज्यातील १३१ जणांवर कारवाई केली आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला.
शरद पवार बुधवारी नाशिक दौऱ्यावर आले आहेत. या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी राज्य व केंद्र सरकारच्या कारभारावर टीका केली. या वेळी त्यांनी आम्ही तीन पक्ष एकत्र लढणार आहोत, असे वक्तव्य केले. देशात शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे, कांदा उत्पादक नाराज आहेत, असेही ते म्हणाले. (Sharad Pawar News)
केंद्र सरकार ईडी-सीबीआयसारख्या यंत्रणांचा विरोधकांच्या विरोधात गैरवापर करत आहेत. कांदा उत्पादक शेतकरी वर्गात राज्य सरकारबद्दल प्रचंड चीड आहे. त्यामुळे देशात शेतकरी वर्गात मोठी अस्वस्थता असल्याचे त्यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले.
लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. त्यानंतर आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे जास्तीत जास्त ठिकाणी जाण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. राज्यात शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस, प्रकाश आंबेडकर , संभाजी राजे यांना घेवून आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. प्रकाश आंबेडकर, संभाजी राजे यांच्या पक्षाला काही जागा सोडण्यासांदर्भात विचार सुरू आहे. लोकांचा कल आमच्या आघाडीला अनुकूल असा असल्याचे त्यांनी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सत्ताधाऱ्यांवर शेतकऱ्यांची नाराजी आहे. ऊस उत्पादक शेतकरी नाराज आहे. बेरोजगारी, महागाई यामुळे मध्यमवर्ग आणि तरुण पिढी देखील अस्वस्थ आहे. निवडणुकीत याचा परिणाम दिसेल. सत्ताधाऱ्यांना याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा यावेळी बोलताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिला.
अलीकडे ED, CBI अशा यंत्रणांचा निवडणुकीसाठी वापर केला जात आहे. या यंत्रणांचा असा वापर सरकारच्या विरोधात जातो. मागील १७ वर्षात ५ हजारांहून अधिक केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. मोदी सत्तेत आल्यानंतर १२१ लोकांची ईडीने चौकशी केली. त्यापैकी ११५ लोक विरोधक आहेत. १२१ लोकांवर कारवाई करण्यात आली ईडीकडून झालेल्या कारवाईत एकही भाजप नेत्याचा समावेश नाही. भाजपमध्ये गेलेल्या हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि अन्य नेत्यांच्या कारवाई थांबल्या असल्याचे त्यांनी सांगितले.