Shivaji Kardile News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सरकारची असली, तरी त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये स्थानिक पातळीवर श्रेयवाद रंगला आहे. सरकारी योजनेत विरोधक आमदारांनी सहभाग घेत असल्याचे सत्ताधाऱ्यांना रुचत नसल्याचे दिसते. भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यात यावरून जुंपली आहे.
शिवाजी कर्डिले यांना प्राजक्त तनपुरेंनी योजनेचे सोशल मीडियावर योजनेचे केलेले ब्रॅण्डिंग खुपले असून, त्यावर टीका केली. "महायुती सरकारच्या चांगल्या योजनेचे फुकट श्रेय घेण्यासाठी विरोधक आमदारांचा खटाटोप सुरू आहे", असा टोला शिवाजी कर्डिले यांनी लगावला.
महायुती सरकारने राज्यातील गोरगरीब गरजू महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेद्वारे गरजू पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. अतिशय महत्त्वाकांक्षी असणाऱ्या या योजनेमुळे राज्यभर या योजनेला महिलांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे भाजपचे (BJP) माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी सांगितले. या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत असून, परिणामी सर्व गाव खेड्यांमध्ये आणि शहरात सुद्धा योजनेसाठी महिलांची झुंबड उडाली आहे, असे शिवाजी कर्डिले यांनी सांगितले.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तसेच स्थानिक आमदारांनी या योजनेवर सुरवातीला टीका केली. ही योजना फसवी आहे. अनुदान जमा होणार नाही. निवडणुकीसाठी सरकारने केलेला फार्स आहे, अशी विधाने केली. परंतु या योजनेला महिलांचा उदंड प्रतिसाद पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे स्थानिक आमदार प्राजक्त तनपुरे यांनी योजनेचे फुकटचे श्रेय लाटण्यासाठी सोशल मीडिया ब्रॅण्डिंग केले. त्यांचा श्रेयवादाचा हा केविलवाणा प्रयत्न यंदा चालणार नाही, असा टोला कर्डिले यांनी लगावला.
वास्तविक स्वतःच्या मंत्रिपदाच्या काळात शेतकऱ्यांच्या शेती पंपाच्या बिलासाठी वीज जोड तोडण्याचे पाप यांनी केले. शेतकऱ्यांनी वर्गणी करून पैसे भरल्याशिवाय ट्रान्सफॉर्म दिले नाहीत. महिला सक्षमीकरणासाठी कोणतेही काम केले नाही. आता दुसऱ्याचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. यांच्या कार्यकर्त्यांमार्फत चुकीचे फॉर्म भरणे, चुकीचे ऑनलाईन करणे, अशा प्रकारचे कृत्य चालू आहे. परिणामी ज्या महिलांना अनुदान मिळाले नाही त्यांचा रोष महायुती सरकारवर येईल व आपल्याला त्याचा फायदा होईल, अशी प्रवृत्ती त्यांनी दाखविल्याचा आरोप कर्डिले यांनी केला.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज स्वीकृती शिबिरांचे बारागाव नांदूर, राहुरी खुर्द, पिंपरी अवघड आणि राहुरी शहरातील आझाद चौक येथे करण्यात आले होते. महिला भगिनींनी कुणाच्याही भूलथापांना बळी न पडू नये. अर्ज व्यवस्थित भरून अंगणवाडी सेविका किंवा महायुतीच्या कार्यकर्त्यांमार्फत ते ऑनलाईन करून घ्यावेत. जेणेकरून आपल्याला अनुदान मिळण्यास कुठलीही अडचण येणार नाही, असे आवाहन शिवाजी कर्डिले यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.