Manikrao Kokate News: विधानसभेच्या सभागृहात जंगली रम्मी खेळतानाचा कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे कोकाटे चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यावर राज्यभर प्रतिक्रिया उमटत आहेत. हा वाद मंत्री कोकाटे यांचा पिच्छा सोडायला तयार नाही.
जंगली रमी प्रकरणाने चांगलीच राजकीय उचल घेतली आहे. आज सकाळी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राजकीय भूमिकेतून आपल्यावर टीका होत असून आपण रमी खेळत नव्हतो असा खुलासा त्यांनी केला आहे. याबाबत आपली बदनामी करणाऱ्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला होता.
मात्र हे प्रकरण थांबेल अशी चिन्हे नाहीत. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. नाशिक, जळगावसह राज्यात विविध ठिकाणी कृषिमंत्री कोकाटे यांच्या निषेधार्थ आंदोलन होत आहे. आज सकाळी पक्षाच्या कार्यक्रमासाठी नाशिक रोडला गेलेल्या कोकाटे यांना शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या आंदोलनाला अचानक सामोरे जावे लागले.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीने नाशिक रोड येथे छत्री वाटपाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला कृषिमंत्री कोकाटे उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते पुढील कार्यक्रमाला जाण्यासाठी गाडीत बसले होते. त्याचवेळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक भैय्या मणियार, योगेश देशमुख आणि निलेश शिरसाठ यांसह विविध कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावर पत्ते फेकले.
अनपेक्षितपणे झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची ही मोठी धावपळ उडाली. यावेळी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी कार्यक्रमात व्यस्त असल्याने त्यांना याची माहिती मिळाली नाही. आंदोलनानंतर आमदार कोकाटे पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले. पोलिसांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले.
राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न अतिशय तीव्र बनले आहे. मतदारसंघात शेतकऱ्यांपुढे अनेक अडचणी, पिकांचे नुकसान आणि पाण्याची टंचाई या समस्या आहेत. मात्र कृषीमंत्र्यांनी सुंदर आणि नाशिककरांचा अपेक्षाभंग केला आहे. ते जंगली रमी खेळण्यात व्यस्त असल्याचे व्हिडिओ प्रसारित झाले. त्यामुळेच आम्ही देखील त्यांना रमी खेळण्याचे निमंत्रण देत आहोत. कृषीमंत्र्यांकडे भरपूर वेळ असल्याने त्यांनी आमच्याबरोबर रमी खेळायला यावे, असे उपरोधिक आवाहन माजी नगरसेवक मनियार यांनी केले.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने काल जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी कृषिमंत्री कोकाटे यांच्या विरोधात आंदोलन करून त्यांच्या राजीनामाची मागणी केली होती. कृषिमंत्र्यांविरोधात राज्यभर वातावरण तयार होत आहे. समाज माध्यमांवरही माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे हे आंदोलन मंत्री कोकाटे यांनाही अपेक्षित नसल्याने आंदोलन स्थळी चांगलाच गोंधळ उडाला.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.