Uddhav Thackrey News: मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याची चर्चा जोरात आहे. त्याचा मुहूर्त कोणता हे सर्व गुलदस्त्यात आहे. मात्र त्याबाबत राज्यातील राजकारणात सगळ्यांनाच मोठी उत्सुकता आहे. नाशिकच्या नेते तर त्यासाठी आणाभाका घेताना दिसतात.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्येही अनुकूल सूर आळवण्यात आला. शहरातील मनसेच्या कार्यालयाचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले. त्यानिमित्त वास्तुशांतीचा कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम सध्या राजकीय दृष्ट्या चर्चेचा विषय ठरला आहे.
या निमित्ताने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, बाळा दराडे, महेश बडवे यांसह विविध पदाधिकाऱ्यांनी कार्यालयाला भेट दिली. त्यांचे मनसे नेते दिनकर पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्साहाने स्वागत केले. दोन्ही नेत्यांनी यावेळी आगामी निवडणुकांच्या आधीच ठाकरे बंधू एकत्र येतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी शिवसेनेचे बाळा दराडे यांनी हिंदुत्व आणि ठाकरे म्हणजेच महाराष्ट्र असा फलक तयार करून आणला होता. त्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे फोटो होते. मनसे कार्यालयात लावण्यासाठी हा फोटो देण्यात आला आहे. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याआधीच नाशिकमध्ये मात्र दोन्ही पक्षांच्या समर्थकांमध्ये "मिले सुर मेरा तुम्हारा" असे चित्र पाहायला मिळाले.
याबाबत बाळा दराडे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. जिल्हाप्रमुख सूर्यवंशी यावेळी अतिशय उत्साही दिसले. मनसेच्या कार्यालयाच्या नूतनीकरणाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण आम्हाला मिळाले होते. त्यामुळे आम्ही मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या. मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र यावेत ही राज्यातील प्रत्येक मराठी माणसाची इच्छा आहे, असे त्यांनी सांगितले.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट अन्य पक्षातील नेत्यांना पायघड्या घालत आहे. अशा स्थितीत सत्ताधाऱ्यांचे राजकीयसोयीचे आणि सत्तेच्या राजकारणाला आव्हान देण्याचे काम ठाकरे बंधू करू शकतात, असा आत्मविश्वास नाशिकच्या कार्यकर्त्यांना वाटतो. मनसे, शिवसेना एकत्र येण्याआधीच नाशिक मध्ये त्यांनी तसा संदेश दिला आहे.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.