श्रीगोंदे (जि. नगर) : नगर (Nagar) जिल्ह्याच्या श्रीगोंदे (Shrigonda) तालुक्यातील छत्रपती शिवाजी खरेदी-विक्री संघाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आज नेत्यांच्या बैठका सुरू होत्या. त्यासाठी दुसऱ्या फळीतील नेते, विशेष करून बाळासाहेब नाहाटा व दत्तात्रेय पानसरे ही जोडगोळी सक्रिय झाली आहे. ही निवडणूक बिनविरोध झाली तर नेत्यांच्या जवळचेच कार्यकर्ते संचालक मंडळात बसतील व अशा वेळी सामान्य कार्यकर्ते तसेच राहतील, अशी शक्यताही व्यक्त होत आहे. (Shrigonda kharedi and Vikri team election will be uncontested?)
संघाच्या तेरा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत मंगळवारपर्यंत आहे. १४८ उमेदवारांचे अर्ज दाखल आहेत. संघाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा व जिल्हा बँकेचे माजी संचालक दत्तात्रय पानसरे यांच्या हाती सूत्रे नेत्यांनीच दिल्याचे दिसले.
नाहाटा-पानसरे यांनी आज दुपारी घनश्याम शेलार यांच्या निवासस्थानी माजी आमदार राहुल जगताप, काँग्रेस नेते राजेंद्र नागवडे, बाबासाहेब भोस यांची बैठक घडवून आणली. त्यांचा प्रस्ताव घेऊन आमदार बबनराव पाचपुते यांच्याकडे दाखल झाले. या दोन्ही बैठकांना ज्येष्ठ नेते भगवानराव पाचपुते, अरुण पाचपुते, वैभव पाचपुते, पोपटराव खेतमाळीस हे उपस्थित असले, तरी नियोजन नाहाटा-पानसरे यांच्याकडेच दिसले.
पाचपुते, जगताप व नागवडे या तीनही नेत्यांचे समाधान होईल असे जागावाटप करण्याचे पहिले आव्हान या दुसऱ्या फळीतील नेत्यांसमोर राहील. त्यातच संघाच्या तेरा जागांसाठी जवळपास दीडशे इच्छुक आहेत. माघारीसाठी नेत्यांना अनेकांची मनधरणी करावी लागणार आहे. त्यातही पंचायत समितीच्या माजी सभापती अर्चना पानसरे, अरुण पाचपुते, लक्ष्मण नलगे, दीपक भोसले, विश्वास थोरात या प्रमुख नेतेमंडळींनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय झाल्यास या नेतेमंडळींना संधी मिळणार की त्यांना डावलून कार्यकर्त्यांना संधी मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कोणत्या नेत्याला किती जागा
या बैठकांमध्ये मध्यस्थी करणाऱ्या आघाडीने दिलेल्या प्रस्तावानुसार, पाचपुते, नागवडे व जगताप यांना प्रत्येकी तीन, तर इतर नेत्यांना चार जागा, असे ठरले आहे. हा प्रस्ताव पाचपुते यांना मान्य आहे का हे उद्याच समजेल. दरम्यान, निवडणूक बिनविरोध झाली व नेत्यांना कुणाला कितीही जागा मिळाल्या, तरी राजकारणात नेत्यांना धोबीपछाड देण्यात माहिर असणाऱ्या दत्तात्रेय पानसरे यांचाच सभापती होईल, असे भाकीत एका नेत्याने व्यक्त केले.
कार्यकर्त्यांच्या सोयीचा निर्णय घेणार : पाचपुते
यापुढील निवडणुका कार्यकर्त्यांसाठी लढणार आहोत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या सोयीचा निर्णय घेण्यात येईल, असे भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांनी स्पष्ट केले.
अजित पवारांच्या आदेशाप्रमाणे निर्णय घेणार : जगताप
खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत आमचे नेते अजित पवार यांच्या आदेशाची अंमलबजावणी केली जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राहुल जगताप यांनी सांगितले.
जागावाटप समाधानकारक झाले तरच चर्चा : नागवडे
बिनविरोधबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. जागावाटप समाधानकारक झाले, तर त्यादृष्टीने चर्चा करण्यात येईल, असे काँग्रेसचे नेते राजेंद्र नागवडे यांनी नमूद केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.