

Shrigonda Nagar Parishad Election : श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतदानानंतर भाजप समर्थकांनी जल्लोष केला होता. आमदार विक्रम पाचपुते यांनी मतदानानंतर विजय जल्लोषात विजयी मुद्रा केली होती. त्यावेळी भाजपने उधळलेला गुलाल आज पु्न्हा विजयाच्या रूपाने उधळला.
नगरपालिका निवडणुकीतील 23 जागांपैकी 14 जागांवर भाजप विजय मिळवला. एकनाथ शिंदे शिवसेनेचे नऊ उमेदवार विजयी झाले. परंतु शिवसेनेच्या उमेदवारांच्या विजयामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप यांची रणनीती असल्याची चर्चा भाजपच्या विजयापेक्षा अधिक रंगली आहे.
श्रीगोंदा (Shrigonda) नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या प्रतिष्ठेच्या लढतीत भाजपच्या सुनिता खेतमाळीस यांनी एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाच्या शुभांगी पोटे यांचा 1 हजार 37 मतांनी पराभव करत, शहराचे प्रथम नागरिक होण्याचा मान पटकावला आहे. मतमोजणीला सुरुवात होऊन पहिल्या फेरीपासूनच भाजपच्या सुनिता खेतमाळीस यांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत टिकून राहिली.
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सुनीता खेतमाळीस यांना 10 हजार 699 मते मिळाली, तर शुभांगी पोटे यांना 9 हजार 662 मते मिळाली त्यांचा 1 हजार 37 मतांनी पराभव झाला. अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादीच्या ज्योती खेडकर यांना 1 हजार 764 तर महाविकास आघाडीच्या उमेदवार गौरी भोस याना 342 मते मिळाली. भोस यांना मिळालेली अल्पमते जेष्ठ नेते बाबासाहेब भोस यांच्यासाठी धक्कादायक आहेत.
नगरपालिका निवडणुकीत आमदार विक्रम पाचपुते यांनी विधानसभेप्रमाणे नियोजन करत पुन्हा एकदा आपले नेतृत्व सिद्ध केले, तर अजित पवार राष्ट्रवादीकडे मातब्बर नेते असताना देखील नगरपालिकेत एकही नगरसेवक निवडून आणता आला नाही. तालुक्यात एवढे बडे नेते असताना नगरपरिषदेत एकही नगरसेवक निवडून न आणता आल्याने नेत्यांची पुरती नाचक्की झाली, तर महाविकास आघाडीची ही यापेक्षा वेगळी अवस्था नाही.
श्रीगोंदा नगरपालिकेत सुरुवातीला अजित पवार राष्ट्रवादी पक्ष, एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष, भाजप आणि महाविकास आघाडी, अशी चौरंगी असलेली निवडणूक महायुतीमधीलच मित्रपक्ष असलेले भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेना पक्षातील अंतर्गत संघर्षामुळे गाजली. श्रीगोंद्याची निवडणूक मनोहर पोटेविरुद्ध भाजप अशीच रंगली. पोटे यांनी एकाकी झुंज दिली मात्र त्यांना अपयश आले.
आमदार विक्रम पाचपुते यांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीबाबत सुरुवातीपासून सस्पेन्स ठेवला होता. शेवटच्या टप्प्यात सुनिता खेतमाळीस यांना उमेदवारी देत सर्वांनाच धक्का दिला. मनोहर पोटे यांना सुरुवातीला सोपी वाटणारी निवडणूक अंतिम टप्प्यात कसोटीची ठरली. आमदार पाचपुते यांनी निवडणुकीवर बारकाईने लक्ष ठेवत अडचणीच्या ठिकाणी स्वतः जाऊन वाटाघाटी केल्या. परिणामी सुनीता खेतमाळीस या विजयापर्यंत जाऊन पोहचल्या.
माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांच्या पाडावासाठी प्रभाग क्रमांक तीनमध्ये जावेद सय्यद यांची उमेदवारी निर्णायक ठरली, त्यांनी 444 मते घेतली. त्या प्रभागात मच्छिंद्र शिंदे यांनी त्यांचा 169 मतांनी पराभव केला. या प्रभागात सय्यद यांची उमेदवारी ही पाचपुते यांची खेळी असल्याचे आता बोलले जाऊ लागले आहे. तर प्रभात क्रमांक 7 (ब) मध्ये अलका अनभुले यांनी 86 मतांनी पोटे यांचा पराभव केला.
श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये माजी नगराध्यक्ष छाया गोरे, मनोहर पोटे, माजी नगरसेवक राजू लोखंडे, आसाराम खेंडके या चार दिग्गजांना मतदारांनी नाकारल्याने पराभवाचा सामना करावा लागला. तसंच नगराध्यक्ष पदासह 23 जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांपैकी 14 जागांवर महिला निवडून आल्याने श्रीगोंदा नगरपरिषदेत महिला राज आले.
श्रीगोंदा नगरपालिकेत राष्ट्रवादीचे उमेदवार ठरविताना राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये अंतर्गत वाद टोकाला पोहोचला होता. यात उमेदवारी ठरविताना माजी आमदार राहुल जगताप अलिप्त असल्याचे दिसले. याचा फटका अजित पवार राष्ट्रवादीला निवडणुकीत बसला. मात्र शिवसेनेकडून निवडून आलेले नऊचे नऊ उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांचेच असल्याची चर्चा खुलेआम होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.