Shrirampur Nagar Parishad Election Result : मंत्री विखेंच्या 28 सभा, तरी धुरंधर ससाणेंनी भेदलं चक्रव्यूह; काँग्रेसचा श्रीरामपूरमध्ये 'स्वाभिमान' विजयी

Shrirampur Municipal Election: Congress Karan Sasane Wins Mayor Post, BJP Strategy Hit : श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस एकहाती सत्ता मिळवली असून, भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजकीय धक्का दिला आहे.
Shrirampur Nagar Parishad Election Result
Shrirampur Nagar Parishad Election ResultSarkarnama
Published on
Updated on

Shrirampur Municipal Election : अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक प्रतिष्ठेच्या ठरलेल्या श्रीरामपूर नगरपरिषद निवडणुकीत अखेर मतदारांनी 'ससाणे' नावाचा दरारा पुन्हा एकदा सिद्ध केला.

दिवंगत नेते जयंत ससाणे यांच्या कार्याची पावती देत, त्यांचे चिरंजीव करण ससाणे 24 हजार 724 मते घेत नगराध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. या विजयात आमदार हेमंत ओगले यांची खंबीर साथ निर्णायक ठरली. काँग्रेसने 20 जागांसह पालिकेवर एकछत्री अंमल मिळवला आहे. दुसरीकडे, एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाने पालिकेत दमदार प्रवेश केला आहे.

2016च्या पडझडीनंतर करण ससाणे यांनी काँग्रेस (Congress) आमदार हेमंत ओगले यांच्या मदतीने अत्यंत शिस्तबद्ध रणनीती आखली होती. वडिलांच्या बेरजेच्या राजकारणाचा वारसा जपत करण ससाणे यांनी 'स्वाभिमानी श्रीरामपूर' ही साद मतदारांना घातली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 28 सभा आणि स्वतः गल्लीगल्लीत तळ ठोकूनही भाजपला केवळ 10 जागांवर समाधान मानावे लागले. तसेच भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीनिवास बिहाणी यांना दुसऱ्या क्रमांकाची 17 हजार 957 मिळालेली मते ही आजवरची मोठी झेप असली, तरी सत्तेचे समीकरण जुळवण्यात विखेंना अपयश आले.

आदिकांचा पराभव आणि राष्ट्रवादीचा अस्त

2016 मध्ये ससाणे यांची सत्ता उलथवून लावणाऱ्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांना मतदारांनी प्रभाग तीन मधून नाकारले आहे. त्यांच्या पराभवासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचा श्रीरामपूर (Shrirampur) पालिकेत सुपडा साफ झाला असून पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही.

Shrirampur Nagar Parishad Election Result
Shirdi Nagar Parishad Election Result : मतदार याद्यांचा घोळ, शिवेवर कट्टर समर्थकाची विरोधात बॅनरबाजी; शिर्डीचा निकाल येताच विखे पिता-पुत्राची विजयाची फुगडी!

​शिवसेनेच्या तीन दिग्गज वारसदारांची सरशी

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ​प्रकाश चित्ते यांच्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होऊनही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना मिळालेली आठ हजार मते ही त्यांच्या वैयक्तिक संघर्षाचा परिपाक मानली जात आहे. ​या निवडणुकीत एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाने तीन जागा मिळवत, आपली उपस्थिती प्रभावीपणे नोंदवली आहे. विशेष म्हणजे, निवडून आलेले तिन्ही चेहरे हे राजकीय वारसा असलेली आहेत. माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या सून ​मंजुश्री, ​माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांचे चिरंजीव संतोष, शिवसेनेचे सागर बेग यांचे बंधू आकाश. या तिघांचा विजय शिंदे गटासाठी मोठे यश मानले जात आहे.

Shrirampur Nagar Parishad Election Result
Rahata Nagar Parishad Election Result : ऐनवेळेला ईव्हीएम मशीन बदलल्याने झाला होता गदारोळ; बालेकिल्ल्यात विरोधकांचे आव्हान विखेंनी रोखताच, गाडेकरांनी उधळला विजयाचा गुलाल

अपक्षाचा विजयाने प्रस्थापितांना धक्का

वंचित बहुजन आघाडी, बसपा आणि सपा यांना केवळ तीन आकडी मतदानावर समाधान मानावे लागले. एका अपक्ष उमेदवाराने आपल्या कामाच्या जोरावर विजय मिळवत प्रस्थापितांना धक्का दिला.

​तणावपूर्ण निवडणूक अन् गुन्हेगारीचे सावट

​निवडणूक काळात राजकीय वातावरण कमालीचे तापले होते. काँग्रेसच्या तीन उमेदवारांवर गुन्हे दाखल झाले, तर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्या अपहरण आणि मारहाणीच्या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. या सर्व तणावपूर्ण वातावरणातही 'स्वाभिमानी श्रीरामपूर' ही टॅगलाईन घेऊन लढणाऱ्या काँग्रेसने तरुणांना संधी देत आणि शांतपणे प्रचार करत सत्ता खेचून आणली. विखेंनी दिलेले विकासाचे आवाहन धुडकावून लावत श्रीरामपूरकरांनी पुन्हा एकदा ससाणे यांच्या 'हाता'त शहराच्या विकासाची चावी दिली आहे.

काँग्रेस कार्यकर्त्यांना विजय समर्पित

नवनिर्वाचित नगराध्यक्ष करण ससाणे यांनी, श्रीरामपूरच्या नागरिकांनी कोणत्याही दडपशाहीला आणि प्रलोभनांना बळी न पडता सजग, स्वाभिमानी असल्याचे दाखवून दिले. शहरामध्ये शांतता, सामाजिक सलोखा रहावा यासाठी माजी आमदार (कै.) जयंत ससाणे यांच्या विचारांवर विश्वास ठेवून काँग्रेसला मतदान केले. श्रीरामपूरला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. तसेच (कै.) ससाणे यांची संघटना व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ सहकारी, मित्र यांनी घेतलेल्या अहोरात्र कष्टाला हा विजय समर्पित करत असल्याचे सांगितले.

काँग्रेसचा 20 जागांवर विजय

श्रीरामपूर नगरपालिकेत एकूण 34 जागांसाठी 148 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यात काँग्रेसने 34 पैकी 20 जागा जिंकत, नगरपालिकेची सत्ता काबिज केली. भाजपने 22 उमेदवार दिले होते. त्यातील 10 उमेदवार विजयी झाले. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 12 उमेदवार पराभूत झाले. एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाने नगराध्यक्षपदासह 32 उमेदवार निवडणुकीत उतरवले होते. यात तीन उमेदवार विजयी झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com