

Rampur village sand mining opposition : श्रीरामपूर तालुक्यातील रामपूर परिसरातील गोदावरी नदीपात्रातील प्रस्तावित वाळूपट्टा लिलावाविरोधात आता ग्रामस्थांनी थेट आरपारची लढाई छेडली आहे. वाळू उपशाला विरोध करणाऱ्या महिलांवर कथित दगडफेक झाल्यानंतर रामपूर आणि नाऊर येथे झालेल्या विशेष ग्रामसभा अक्षरशः वादळी ठरल्या. संतप्त महिलांनी ‘रणरागिणी’चा अवतार धारण करत, “वाळूचा रस्ता तर होऊ देणार नाहीच, पण नदीपात्रातील वाळूचा एक खडाही उचलू देणार नाही,” असा इशारा प्रशासनाला दिला.
या आंदोलनाला सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनीही उघड पाठिंबा दिल्याने वाळू उपशाविरोधातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
श्रीरामपूरच्या (Shrirampur) रामपूर ग्रामसभेनंतर संतप्त महिलांनी ट्रॅक्टरमधून थेट नाऊर गावाकडे मोर्चा वळवत तेथेही विशेष ग्रामसभा घेतली. दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी एकमुखाने वाळू लिलाव तात्काळ रद्द करण्याची मागणी केली.
“गेल्या शंभर वर्षांत आम्ही गोदावरीतील वाळूचा एक कणही उचलू दिलेला नाही आणि पुढेही देणार नाही,” असा निर्धार महिलांनी (Women) व्यक्त केला. प्रशासनाने स्थानिकांच्या भावना, शेती आणि पर्यावरणाचा विचार न करता जबरदस्तीने वाळू उपसा सुरू केल्यास ‘समृद्धी महामार्गा’वर तीव्र लोकआंदोलन उभे करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
वाळू उपशाला विरोध करणाऱ्या महिलांवर कथित दगडफेक झाल्यानंतरही महसूल आणि पोलीस प्रशासनाने संबंधितांवर ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असताना प्रशासन नेमके कोणाची वाट पाहत आहे, असा संतप्त सवाल ग्रामसभेत उपस्थित करण्यात आला.
दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल न झाल्यास गावागावांत अहोरात्र पहारा ठेवत आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. दरम्यान, तहसीलदार मिलिंद वाघ यांनी दोन्ही गटांची तहसील कार्यालयात बैठक बोलावली होती. मात्र, ग्रामस्थांनी बैठकीकडे पाठ फिरवल्याने ती होऊ शकली नाही.
ग्रामस्थांनी वाळू उपशामुळे उद्भवणाऱ्या संभाव्य धोक्यांकडेही लक्ष वेधले. नदीपात्रातील वाळूमुळे पाझरपाणी टिकून राहते. मोठ्या प्रमाणात वाळू उपसा झाल्यास भूजलपातळी खालावून शेती संकटात येईल, असा दावा करण्यात आला.
याशिवाय जड वाहतुकीमुळे ग्रामीण रस्ते उद्ध्वस्त होतील, विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रवासावर परिणाम होईल आणि वाळू व्यवसायामुळे ग्रामीण भागातील तरुण व्यसनाधीनतेकडे वळण्याची भीतीही ग्रामस्थांनी व्यक्त केली. वाळू उपशामुळे नदीतील पाण्याचा वेग वाढून सराला बेट आणि आसपासच्या गावांनाही धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात आली.
सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनीही ग्रामस्थांच्या आंदोलनाला ठाम पाठिंबा दर्शवला. रामपूर, नाऊर, सराला-गोवर्धन आणि वांजरगाव परिसरातील नागरिकांचा विरोध पूर्णपणे न्याय्य असल्याचे त्यांनी म्हटले.
“नदीपात्रात पाणी असताना ठेकेदाराला ताबा देणे किंवा यंत्रसामग्री नेण्याचा कोणताही अधिकार तहसीलदारांना नाही. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सराला बेट आणि परिसरातील शेती वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी सुरू केलेल्या या लढ्यात आम्ही पूर्ण ताकदीने त्यांच्या सोबत आहोत,” असे महंत रामगिरी महाराज म्हणाले. यासंदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगत, “गरज पडल्यास इतर मंत्र्यांशीही बोलू; पण गोदावरीत वाळू उपसा होऊ देणार नाही,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.