Supriya Sule News: गेली काही दिवस राज्यात महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा प्रचार होत आहे. त्या कार्यक्रमाला महिलांची गर्दी होते. ही गर्दी कशी होते? याची अनेकांना उत्सुकता आहे.
या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुतीच्या मर्मावरच बोट ठेवले आहे. जळगाव येथील आपल्या दौऱ्यात त्यांनी याबाबत महायुतीच्या या मेळाव्यांच्या गर्दीचे वास्तव सगळ्यांपुढे मांडले.
महायुतीच्या एकंदरीत राजकीय मेळाव्यांना होणारी गर्दी आता चेष्टेचा विषय झाली, तर नवल वाटू नये. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमांना महिलांची गर्दी असते. यावेळी अनेक महिला त्यांना राख्या देखील बांधतात. या राख्या बांधणाऱ्या महिला कोण? याचा उलगड आता होऊ लागला आहे.
याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या, मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानात बचत गटाच्या महिलांनी आलेच पाहिजे, असा दंडक आहे. बचत गटाच्या महिला या कार्यक्रमांना उपस्थित न राहिल्यास त्यांना शासकीय निधी दिला जाणार नाही, अशा धमक्याच दिल्या जातात.
सर्वसामान्य आणि गरजू महिलांवर अशा प्रकारे दडपशाही सरकारकडून सुरू आहे, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यासाठी शासकीय यंत्रणांचा वापर होतो. हे लपून राहिलेले नाही. अशा प्रकारे महिला आणि बचत गटांवर दडपशाही करणाऱ्या सरकारला आता हद्दपार करण्याची वेळ आली आहे.
भीती दाखवून मते मिळत नसतात. मते मिळवण्यासाठी परस्परांवरील विश्वास हवा असतो. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एकतीस मतदार संघात मतदारांनी महायुतीला जोरदार झटका दिला आहे.
महाविकास आघाडीच्या सर्वसामान्य उमेदवारांवर मतदारांनी विश्वास दाखवला. तसाच विश्वास आगामी विधानसभा निवडणुकीत देखील मतदार दाखवतील. या संदर्भात माझ्या मनात तरी कोणतेही शंका नाही, असे खासदार सुळे म्हणाल्या.
लाडकी बहीण योजनेचा राज्य शासनाकडून धुमधडाक्यात प्रचार सुरू आहे. एरव्ही राजकीय कार्यक्रमांकडे पक्षाचे कार्यकर्तेही हल्ली पाठ फिरवतात. अशावेळी कार्यक्रमांना गर्दी करणे, हे राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मोठे आव्हान असते.
अशा स्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यांना मोठ्या प्रमाणावर महिलांची गर्दी झाली होती. अशीच गर्दी जळगाव येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या लाडकी बहीण योजना आणि शासकीय कार्यक्रमाच्या लोकरपणाच्या समारंभाला झाली होती.
या महिला आहेत तरी कोण? आणि कार्यक्रमाला उपस्थित राहतात तरी कशा? अशी शंका विरोधकांना आणि राजकीय कार्यकर्त्यांना वाटत होती. त्याचा खुलासा आता होऊ लागला आहे.
लाडकी बहीण कार्यक्रमाला येणाऱ्या महिला खऱ्या तर लाडक्या नसतातच. कारण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उभे राहिल्यावर या लाडक्या बहिणी कार्यक्रमातून काढता पाय घेताना दिसतात. या सर्व लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाचे रहस्य खासदार सुळे यांनी उघड केले आहे.
महायुतीच्या सध्या धुमधडाक्यात होत असलेल्या कार्यक्रमांच्या उपस्थितीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राजकीयदृष्ट्या आता हे कार्यक्रम चर्चेचा विषय आहेत.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.