Shivsena Uddhav Thakre Politics News : शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या आपल्या मुक्त संवाद अभियानासाठी गुरुवारी सिन्नर येथे आल्या होत्या. त्यांच्या या दौऱ्यात महिला तसेच युवकांनी त्यांच्याशी उत्स्फूर्त संवाद साधला. यावेळी अंधारे यांना मिळालेला प्रतिसाद आगामी निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरला.
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेत्या अंधारे सध्या मातृतीर्थ ते शिवतीर्थ या आपल्या मुक्त संवाद अभियाना अंतर्गत सिन्नर येथे आल्या होत्या. यावेळी त्यांचे विविध गावांमध्ये उत्स्फूर्त स्वागत झाले. त्यांनी महिला आणि नागरिकांशी थेट संवाद साधला सिन्नर येथे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अभ्यासिकेत युवकांनी त्यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत अंधारे यांनी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी युवक आणि युवतींना टिप्स देत प्रश्नोत्तरे केली.
सायाळे, दुशिंगपूर, वावी, पांगरी, दातली, खोपडी, सिन्नर शहर तसेच शेणीत (इगतपुरी) येथे सुषमा अंधारे यांचे कार्यक्रम झाले. नगर येथील स्पर्धा परीक्षा केंद्रात सुमारे पाचशे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत झालेल्या त्यांचा कार्यक्रम विशेष चर्चेचा ठरला. यावेळी त्यांनी महिला अत्याचाराच्या विविध घटनांचा उल्लेख केला. या घटनांबाबत विद्यार्थ्यांना माहिती आहे का?. सध्या देशातील राजकीय दृष्ट्या करंट अफेयर्स म्हणून फक्त महिला अत्याचारांची चर्चा का होते, असा प्रश्न करून त्यांनी सध्याचे सरकार महिलांना सुरक्षा देण्यात अपयशी ठरले आहे, असा आरोप केला.
महाराष्ट्रात भाजप प्रणित सरकार आहे. या सरकारमध्ये गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काम करतात. गृहमंत्र्यांच्या पत्नीनेच यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार केलेली आहे. त्यामुळे गृहमंत्री आणि सरकार महिला सुरक्षेविषयी बोलू शकते का?, तसा त्यांना नैतिक अधिकार प्राप्त होतो का? असा सवाल त्यांनी केला आहे.
यावेळी माजी आमदार राजाभाऊ वाजे, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, उपजिल्हाप्रमुख दीपक खुळे, तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर गाडे, किरण कोथिंबिरे, दीपक वेलजाळी, बाजार समितीचे सभापती विठ्ठल राजे भोसले, सोपान घेगडमल, मनीषा घेगडमल, संतोष जोशी, गणेश वेलजाळी या शिवसेनेच्या (Shivsena) पदाधिकाऱ्यांनी ही संवाद यात्रेत भाग घेतला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राज्यातील सरकारने महाराष्ट्राची राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा मोडीत काढीत विरोधी पक्षांना धाकदपटशा करीत फोडाफोडीचे राजकारण केले आहे. त्यामुळे बहुमत असले तरी जनतेच्या मनातून भारतीय जनता पक्ष पूर्णतः उतरला आहे. त्याचा फटका त्याला येत्या आगामी निवडणुकीत बसेल, असा दावा सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला.
अंधारे यांनी सध्याचे सरकार स्वतःचे प्रसिद्धी आणि नेत्यांची चमकोगिरी यात अखंड बुडाले आहे. त्यांच्याकडे जनतेसाठी कोणतेही धोरण नाही. राज्यासाठी विकासाच्या योजना नाही. राज्यातील अनेक उद्योग, प्रकल्प शेजारच्या राज्यात पळविले जात असताना मुख्यमंत्री शांतपणे बसून आहेत. ते आपली सत्ता राज्याच्या हितासाठी की कोणासाठी वापरतात, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे राज्यातील जनता हे केवळ उघड्या डोळ्यांनी पाहणार नाही. त्यांच्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा एक उत्तम पर्याय आगामी निवडणुकीत उपलब्ध आहे. महाविकास आघाडीचे सर्व नेते एक दिल्याने काम करीत असून आगामी निवडणुकीत त्याचे परिणाम दिसून येतील, असा दावा त्यांनी केला.