

Ahilyanagar politics : शिस्तप्रिय म्हणून ओळखली जाणारी, पार्टी विथ डिफरेंस म्हणून घेणाऱ्या भाजपचा नगरपालिका निवडणुकीत संघटनेतील वाद चव्हाट्यावर आले आहेत. भाजपच्या या पदाधिकाऱ्याला पक्षातून निलंबित करा, हकालपट्टी करा, अशी मागणी जिल्हाध्यक्षांकडे करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीत 'तुतारी'चा प्रचार, अवैध जमीन व्यवहार, वाळूधंदा, आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून पत्नी निवडणुकीच्या रिंगणात, एवढ्या पक्षविरोधी कारवाया असल्याने भाजपचे प्रदेश चिटणीस अरुण मुंडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
भाजपच्या (BJP) शेवगावमधील पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांना निवेदन देण्याबरोबरच, आणखी एक प्रत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे देखील पाठवली आहे. भाजपचे पाथर्डी तालुका मंडलाध्यक्ष धनंजय बडे, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष सचिन वायकर, कोरडगाव मंडलाध्यक्ष दिंगबर भवार, शेवगावचे राहुल बंब, मंडलाध्यक्ष महेश फलके, राजभाऊ लड्डा, शेखर मुरदारे यांनी हे निवेदन दिलं आहे. भाजप पदाधिकाऱ्यांच्या या निवेदनावर वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात, याकडे आता लक्ष लागलं आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत अरुण मुंडे यांनी 'तुतारी'चा प्रचार केला होता. पक्षाच्या आमदार मोनिका राजळे (Monika Rajale) यांनी मंजूर केलेल्या विकासकामांमध्ये विरोधकांना सोबत घेऊन खोडा घातला. कामांच्या विरोधात आंदोलन केले. पक्षाकडून पदे घ्यायची व त्या पदाचा वापर ठेकेदाराची कामे मिळवणे, वाळूधंदा, अवैध जमीन व्यवहारांसाठी करायचा. पक्षाचे लोकप्रतिनिधी आणि पक्षश्रेष्ठी यांच्याविरोधात आरोप करत गलिच्छ वक्तव्य करायची. भाजपचे नेते तथा आरएसएसच्या वरिष्ठ नेत्यांविषयी चुकीचे विधाने करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या राज्यस्तरीय नेत्यांबरोबर ते संधान बांधून आहेत, असा गंभीर आरोप दिलेल्या निवेदनातून केला आहे.
शेवगाव नगरपालिका निवडणुकीत उभे राहिलेल्या भाजप उमेदवारांना दमदाटी करण्याचेही प्रकार सुरू आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांची पक्षातून हकालपट्टी मागणी करण्यात आली होती. मात्र कारवाई झाली नाही. मुंडे यांच्याविरोधात कारवाई न झाल्यास पक्षात अन् पर्यायाने समाजात वेगळा संदेश जाईल. त्यामुळे तातडीने मुंडे यांच्याविरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दरम्यान, पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघात आमदार मोनिका राजळे आणि अरुण मुंडे यांच्यातील वाद विकोपाला पोहोचला आहे. नगरपालिका निवडणुकीत हा वाद आणखी उफळला आहे. भाजपचे अरुण मुंडे यांची पत्नी माया मुंडे या शेवगाव नगरपालिकेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी करत आहेत. अरुण मुंडे यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. पण पक्षाने तिकीट नाकारले.
पत्नी माया या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी करत असल्या, तरी अरुण मुंडे हे भाजपमध्येच असल्याचा दावा करत आहेत. मुंडे यांच्या पत्नी माया यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश न करताच, उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, भाजप पदाधिकाऱ्यांच्या या निवेदनावर अरुण मुंडे आणि दिलीप भालसिंग यांच्याशी संपर्क साधून म्हणणे जाऊन घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.