

teachers summer vacation : शालेय परीक्षा, तसेच मतदारयाद्यांच्या पुनरीक्षण कार्यक्रमात आधीच गुंतलेल्या शिक्षकांवर आता आणखी एक नवी जबाबदारी येण्याची शक्यता आहे. या नव्या जबाबदारीमुळे उन्हाळी सुट्टीच्या आनंदाला शिक्षक मुकणार असून उन्हाळी सुट्टी देखील कामातच जाण्याची शक्यता आहे.
राज्यभरातील शाळांना २ मे ते १४ जूनपर्यंत उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र शिक्षकांना या सुट्ट्यांचा आनंद घेता येणार नसल्याचं चित्र आहे. कारण मे महिन्यात जनगणनेचा टप्पा पार पडणार असून, यासाठी शिक्षकांना घराघरांमध्ये जाऊन माहिती जमा करुन घेण्याची जबाबदारी दिली जाणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळते आहे. त्यामुळे यंदा कुटुंबीयांसह उन्हाळी सुट्यांचा आनंद शिक्षकांना घेता येणार नाही, कारण त्यांना जनगणनेचं काम करावं लागणार आहे.
एप्रिल महिना म्हणजे शाळांमध्ये परीक्षांचा हंगाम. त्यामुळे शिक्षक सध्या परीक्षा घेणे आणि त्यानंतर निकाल वेळेत जाहीर करण्याच्या कामात गुंतलेले आहेत. याच दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरीक्षणाच्या कामालाही शिक्षकांना जुंपण्यात आले आहे. परिणामी शिक्षक सध्या एकाच वेळी दोन जबाबदाऱ्या सांभाळताना दिसत आहेत.
या सगळ्या धावपळीतही दरवर्षीप्रमाणे मे महिन्यात कुटुंबासोबत गावी किंवा एखाद्या पर्यटनस्थळी वेळ घालवण्याचं प्लॅनिंग शिक्षकांकडून केलं जात आहे. त्यासाठी मतदारयादीचं काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्यावर त्यांचा भर आहे. मात्र, आता राष्ट्रीय जनगणनेची जबाबदारीही शिक्षकांवर येण्याची चिन्हं दिसत आहेत. प्रशासकीय स्तरावर त्यासाठी प्राथमिक हालचाली सुरू झाल्या असून, त्यामुळे शिक्षकांच्या उन्हाळी सुट्टीच्या नियोजनावर पाणी फिरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रशासकीय स्तरावर जनगणनेची तयारी सध्या वेगाने सुरू आहे. यासाठी नियुक्त नोडल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सध्या सुरु आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मे महिन्यात घरोघरी भेटी देत माहिती संकलनाची प्रक्रिया राबवली जाणार आहे. या कामासाठी शिक्षकांची नेमणूक केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे यंदा शिक्षकांना उन्हाळी सुट्यांचा आनंद घेण्यापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.
जनगणना प्रक्रियेत जिल्हा प्रशासनासह स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या मोहिमेसाठी विविध अधिकाऱ्यांवर विशिष्ट जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या असून, त्या वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश वरिष्ठ स्तरावरून देण्यात आले आहेत. त्यामुळे शिक्षकांप्रमाणेच अधिकाऱ्यांचाही संपूर्ण मे महिना कामातच व्यस्त जाण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.