Ahmednagar Political News : गेल्या 40 वर्षांपासून नगर जिल्हा विभाजनाचा विषय प्रलंबित आहे. श्रीरामपूर की संगमनेर असा वाद चालला आहे. पण यात शिर्डीने अचानक उडी मारली आणि श्रीरामपूरचे नाव मागे पडले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि भाजप नेते राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील या उत्तर नगर जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांत आजपर्यंत जिल्हा विभाजन आणि जिल्हा मुख्यालय हा विषय चर्चेत राहिला आहे. मात्र निर्णय काही झाला नाही. आता अपर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डीत झाल्याने जे संकेत मिळत आहेत त्यात श्रीरामपूरचे राजकारण ढवळून निघत आहे.
श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सभेत श्रीरामपूर जिल्ह्याच्या प्रश्नाने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. त्यामुळे तालुक्यातले राजकीय वातावरण ढवळले गेले आहे. या सभेत शेतकरी संघटनेचे जितेंद्र भोसले यांनी भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे यांना लक्ष्य केले. सत्तेत असूनही जिल्ह्याचा प्रश्न मार्गी लागत नसेल तर राजीनामा द्या, असे अप्रत्यक्षपणे भोसले यांनी पटारे यांना सुनावले. त्याला पटारे यांनीही माझ्या राजीनाम्यामुळे जर जिल्ह्याचा प्रश्न मार्गी लागत असेल तर राजीनामा देण्याची आपली कधीही तयारी आहे असे उत्तर दिले.
या आव्हान -प्रतिआव्हानामुळे श्रीरामपूरकरांसाठी जिव्हाळ्याचा असलेल्या श्रीरामपूर जिल्ह्याचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. जिल्ह्याच्या प्रश्नावर श्रीरामपूरकर नागरिक हे संवेदनशील असून, अपर जिल्हाधिकारी कार्यालय श्रीरामपूरऐवजी शिर्डीला सुरू झाल्यानंतर याप्रश्नी आंदोलने सुरू झाली होती. त्यातून जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना टार्गेट करण्याचाही प्रयत्न झाला.
शासन दरबारी चाळीस वर्षांपासून गुणवत्तेच्या आधारावर प्रस्तावित जिल्ह्याचे ठिकाण म्हणून असलेल्या श्रीरामपूरचे नाव नेहमीच डावलले जात असल्याची भावना येथील जनमानसात झालेली आहे. आतापर्यंत केवळ राजकीय इच्छाशक्ती, श्रेयवाद यामुळेच हा प्रश्न प्रलंबित राहिला असल्याची चर्चा श्रीरामपूरकरांत आहे. दरम्यान, या सभेत माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान शिवसेना (Shivsena) नेते संजय छल्लारे यांनी श्रीरामपूर जिल्हा व्हावा, अशी मागणी केली होती.
भोसले यांनीही तीच मागणी लावून धरत भाजपचे (BJP) तालुकाध्यक्ष पटारे यांच्याकडे निर्देश करत राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe Patil) यांचे नाव न घेता नेत्यांचे निकटवर्तीय तसेच सत्तेत असूनही श्रीरामपूर जिल्ह्याचा प्रश्न मार्गी लागत नसेल तर पदावर न राहता राजीनामा द्यावा असे म्हटले. त्यावर दीपक पटारे यांनीही केवळ माझ्या राजीनाम्यामुळे जिल्ह्याचा प्रश्न सुटणार असेल तर मी कधीही राजीनामा द्यायला तयार आहे. मुळात सरकारच्या अजेंड्यावर जिल्हा विभाजनाचा सध्या कोणताही प्रस्ताव नाही. त्यामुळे सध्या त्यावर बोलणे योग्य नाही. जेव्हा सरकार जिल्हा विभाजनाच्या प्रश्नावर निर्णय घेईल त्यावेळी श्रीरामपूर जिल्ह्यासाठी आपण सर्वजण संघटित ताकदीने एकत्र उभे राहू, अशी ग्वाहीही पटारे यांनी दिली.
एकंदरीतच श्रीरामपूर जिल्ह्याचा प्रश्न सुटेल तेव्हा सुटेल, परंतु वेगवेगळ्या व्यासपीठांवरून या प्रश्नाला पुढे करून राजकारणाला फोडणी देण्याचे प्रकार घडत आहेत. सर्वसामान्य श्रीरामपूरकरांना मात्र या राजकीय सुंदोपसुंदीपेक्षा श्रीरामपूर जिल्हा लवकर घोषित व्हावा, अशी अपेक्षा आहे.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.