नंदुरबार : अक्कलकुवा (Nandurbar) तालुक्यातील ठिकठिकाणी केलेल्या शासकीय बांधकामाच्या (PWD)बिलाची रक्कम अदा करण्यासाठी ठेकेदाराकडून ४३ लाख ७५ हजार रुपयाची लाचेची मागणी करणाऱ्या अक्कलकुवा येथील जिल्हा परिषद (ZP) बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता व सहाय्यक अभियंता गजाआड झाले आहे. आदिवासी भागात एव्हढ्या मोठ्या प्रमाणातील लाचखोरीने खळबळ उडाली आहे.
या अभियंत्यासह एका खासगी व्यक्तीस लाचेचा चार लाखांचा पहिला हप्ता स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहात पकडले. तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तक्रारदार हे शासकीय मान्यताप्राप्त व नोंदणीकृत बांधकाम ठेकेदार आहेत. तक्रारदार यांना जिल्हा परिषद अंतर्गत अक्कलकुवा उपविभाग मार्फत भगदरी येथील गुरांच्या दवाखान्याची नवीन इमारत बांधणे, रस्ता सुधारणा, रस्ता जलनिस्सारणाची कामे व इतर ४५ कामांचे कार्यारंभ आदेश मिळाले होते. नमुद सर्व कामे तक्रारदार यांनी पूर्ण केली आहेत. सदर कामांबाबत संशयित लोकसेवक यांनी तक्रारदार ठेकेदार यांचे आठ कोटी पंचेचाळीस लाख एकोन्नवद हजार रुपयाची अंतिम देयके मान्य केली असून यापैकी एकूण सात कोटी एकसष्ट लाख एकोन्नवद हजार रुपये एवढी रक्कम तक्रारदार यांना प्राप्त झाली आहे.
मान्य रकमेपैकी उर्वरित ८४ लाख एवढी रक्कम राखून ठेऊन तक्रारदार यांना मुद्दामहून अनामत रक्कम राखून ठेवली असे सांगितले. सदरची ८४ लाख रुपये रक्कम मिळणेकामी तक्रारदार यांनी वेळोवेळी जि.प. बांधकाम उपविभाग कार्यालयात उपअभियंता सुनील पिंगळे व सहाय्यक अभियंता एस. बी. हिरे यांना भेटून देय रक्कम मिळणे कामी विचारणा केली असता त्यांनी तक्रारदार यांना वेळोवेळी या आधी अदा केलेल्या देयकांबाबतच्या रकमेच्या मोबदल्यात उपअभियंता पिंगळे यांनी तीस लाख पन्नास हजार रुपये व शाखा अभियंता एस. बी. हिरे यांनी तेरा लाख पंचवीस हजार रुपयांची अशी एकूण त्रेचाळीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये एवढ्या रकमेची मागणी केली. मागणी केलेली रक्कम दिले नाही तर तुमचे उर्वरित देयके तुम्हाला भेटू देणार नाही, असे सांगितले.
तक्रारदार यांनी ठेकेदाराने रक्कम द्यावी याची हमी म्हणून जळगाव जनता सहकारी बँक शाखा नंदुरबारचा ३० लाख ५० हजार व तेरा लाख २५ हजार रुपयांचा धनादेश दिनेश यादवराव सोनवणे या त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीच्या नावाने लाचेपोटी लिहून घेऊन ताब्यात ठेवले. रोख रक्कम आणून दिल्यानंतर दोन्ही धनादेश परत करून देऊ असे सांगितले होते.
उपअभियंता सुनील दिगंबर पिंगळे, सहाय्यक अभियंता एस. बी. हिरे यांनी तक्रारदार यांच्याकडून ४३ लाख ७५ हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती प्रथम हप्ता टोकन रक्कम चार लाख रुपये आज पंच साक्षीदारांसमोर स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधविभागाचे पथकाने ताब्यात घेतले. पोलिस उप अधीक्षक राकेश चौधरी, पोलिस निरीक्षक समाधान वाघ, माधवी वाघ यांनी हवालदार उत्तम महाजन, विलास पाटील, विजय ठाकरे, पोलिस नाईक अमोल मराठे, संदीप नावाडेकर, देवराम गावित, ज्योती पाटील व जितेंद्र महाले यांनी ही कारवाई केली.
------
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.