Ahmednagar Political News : भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना भाजपमध्ये सामावून घेण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नीतीचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. भाजपमध्ये अशोक चव्हाणांचा प्रवेश म्हणजे, "मला नाही अब्रू आणि कशाला घाबरू, अशी दोघांची गत आहे", अशा शेलक्या शब्दांत त्यांनी टीकास्त्र सोडले. उद्धव ठाकरे हे शिर्डी लोकसभा मतदारसंघात दोन दिवस दौऱ्यावर आहेत. त्याच्या दौऱ्यांवर सोनई (ता. नेवासे) येथून संवाद सभेने सुरुवात झाली.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, "अशोकरावांचा भाजप प्रवेश झाला. ज्यांच्याविरोधात लढायचे आहे, त्यांच्याच पक्षात गेले. त्यांच्या आदर्श घोटाळ्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस काय आरोप करत होते, हे आता आठवायला लागले आहे. गेल्या आठवड्यात अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडला, त्यात श्वेतपत्रिका काढली. त्यात आदर्श घोटाळ्याचा उल्लेख आहे. यानिमित्ताने विसरलेला अशोकरावांच्या घोटाळ्याची आठवण भाजपमध्ये गेल्यावर झाली".
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पंतप्रधान स्वतः यावर म्हणाले होते की, शहीद कुटुंबीयांचा अपमान केला, तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले होते की, हे लीडर नसून डीलर आहेत. एकंदर दोन्ही घाबरले आहेत. हे बोलून बसलेत, चारशे पार. पण हे चाळीस पारदेखील होत नाहीत. त्यामुळे नितीश कुमार, अशोक चव्हाणांना फोड अशी स्थिती सुरू आहे. या दोघांची परिस्थिती अशी आहे की, 'मला नाही अब्रू, मी कशाला घाबरू'. यांच्या अब्रूचे धिंडवडे निघालेत, असा घणाघात ठाकरेंनी केला.
विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळीचा तडाखा बसला आहे. काही ठिकाणी गारपीटदेखील झाली आहे. कोणी कोणाकडे जायला पाहिजे हे कळायला पाहिजे. आज अशोक चव्हाणांनी (Ashok Chavan) भाजपकडे जाण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या बांधावर जाणे गरजेचे होते. तुमचे राज्यसभेचे स्वप्न जे काही असेल, पण ते तुमच्यापर्यंत. पण शेतकऱ्यांनी ठेवलेल्या विश्वासाचे काय?, असा प्रश्नही ठाकरेंनी चव्हाणांना उद्देशून केला.
पराभवाचे पाणी पाजायचे
शिवसेना फुटल्यानंतर शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे हे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात सामील झाले. 'एक तर खासदार पाणी भरायला तिकडे गेलेच आहेत. पुन्हा त्याने उभे राहूच दाखवावेच, असे ठाकरे म्हणताच, खालून सभेतून त्याला पाडायचा आहे', असा सूर कार्यकर्त्यांनी आवळला. यानंतर ठाकरेंनी, आपल्या उमेदवारासमोर भाजप आणि त्याच्या भ्रष्ट साथीदारांनी उमेदवार उभा करूच दाखवावा, त्यानंतर कळेल निष्ठावान कसा पाणी पाजतो ते. निळवंडे श्रेय घेत होते. पण त्याची मेहनत आपली. आता त्यांना निळवंडे पाणी नाही पाजायचे, तर पराभवाचे पाणी पाजायचे, असेही सांगून कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागा', असा अप्रत्यक्ष आदेशच ठाकरेंनी दिला.
(Edited by Sunil Dhumal)
R
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.