
Nashik Politics : ठाकरेंनी हकालपट्टी केलेल्या सुधाकर बडगुजर यांना पक्षात घेण्यासाठी भाजपचे वरिष्ठ उतावीळ झाले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर बडगुजर यांच्यासाठी पायघड्याच घातल्या आहेत. बडगुजर यांची पार्श्वभूमी देखील ते बघायला तयार नाहीत. पक्षातील आमदार पदाधिकाऱ्यांचा तीव्र विरोध असतानाही त्यांनी बडगुजर यांच्यासाठी पक्षात रेड कार्पेट टाकलं आहे.
सुधाकर बडगुजर यांचा नाशिकच्या राजकारणात चांगला दबदबा आहे. बडगुजर यांच्याकडे असलेलं आर्थिक बळ व स्थानिक राजकीय यंत्रणेवर असलेली मजबुत पकड पाहाता यापूर्वीच भाजपला ते हवे होते. परंतु ते बऱ्या बोलाने येत नसल्याने मधल्या काळात त्यांची अडचणी होईल अशा फायली ओपन झाल्या. नंतर सलीम कुत्ता सोबतचा त्यांचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला. थेट देशद्रोहाचा आरोपच त्यांच्यावर करण्यात आला. हे सगळं करुनही ते ठाकरेंना सोडत नाहीत म्हटल्यावर थेट त्यांच्या कुटुंबावरच घाला घालण्यात आला अन् मग अर्थातच ते वरमले.
विधानसभेत ठाकरेंनी त्यांना तिकीट दिलं, परंतु बडगुजर यांचा पराभव झाला. तेव्हापासूनच म्हणे त्यांना शिंदेसेना किंवा भाजपमध्ये जाण्याचे वेध लागले होते. त्यांच्यासोबत ते अनेक माजी नगरसेवकांनाही घेऊन जाणार असल्याचं बोललं जात होतं. परंतु संजय राऊत यांचा उजवा हात समजले जाणारे बडगुजर या सगळ्या गोष्टींना निडर होत तोंड देतील व भाजपच्या वळचणीला जाणार नाही अशी भाबडी अपेक्षा उद्धव ठाकरेंची होती. मात्र प्रत्यक्षात ठाकरेंची अपेक्षा फोल ठरली.
बडगुजर यांनी संजय राऊत नाशिकमध्ये असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. शिवसेना संपवण्याची भाषा करणाऱ्या गिरीश महाजन यांच्यासोबत फोटो काढला. एवढ्यावरच न थांबता अचानकपणे आपण पक्षात नाराज असल्याचे बोलून दाखवले. तेव्हा कुठे बडगुजर यांचे मनसुबे उघड झाले. त्याचवेळी सावध होत उद्धव ठाकरेंनी बडगुजर यांच्या हकालपट्टीचा डाव टाकला. त्यामुळे हाचलाची अधिकच गतिमान झाल्या. भाजपही बडगुजर यांना पक्षात घ्यायला किती आतुर आहे हे समजलं.
परंतु उद्धव ठाकरेंच्या या मास्टरस्ट्रोकमुळे आता भाजपमध्येच अस्वस्थता निर्माण झाली आहे. शहरात तीन आमदार आहेत, महापालिकेवर सत्ताही होती तरीही पक्ष बडगुजर यांना पक्षात घेतो आहे. त्यामुळे शहरातील भाजपचे तीन्ही आमदार अस्वस्थत झाले आहेत. आमदार सीमा हिरे यांनी बडगुजर यांना पक्षात घेऊ नका म्हणून विरोध केला. बडगुजर यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले, त्यांना पक्षात घेऊन पक्षाची प्रतिमा मलिन होईल म्हणून सांगितलं. मात्र बावनकुळे यांनी सीमा हिरे यांच्या आरोपांना केराची टोपली दाखवली. केवळ आरोप केले गेले आहेत, ते सिद्ध झालेले नाहीत त्यामुळे कुणाला आरोपी म्हणता येणार नाही असं म्हणत त्यांनी बडगुजर यांची पाठराखण केली.
मात्र त्यामुळे आता बावनकुळे यांनी आपल्याच पक्षातील आमदार व पदाधिकाऱ्यांना हिणवल्याची भावना तयार झाली आहे. शहरातील तीन्ही आमदारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी भाजपच्या वरिष्ठांकडून हे सर्व केलं जात आहे, असही राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. मात्र, यामागे भाजपची काहीही रणनिती असली तरी त्यांच्याच पक्षात त्यामुळे अंतर्गत असंतोष निर्माण झाल्याचं चित्र आहे. उद्धव ठाकरेंनी वेळीच बडगुजर यांचे मनसुबे ओळखून निर्णय घेतला. उद्धव ठाकरेंचा हाच डाव भाजपवर भारी पडल्याचं बोललं जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.