Shivsena-MNS News: राज्यात महायुतीचे सरकार आहे. या सरकारकडून विरोधी पक्षांना खिळखिळे करण्याचे काम सुरू आहे. त्याला आव्हान देण्याची क्षमता फक्त ठाकरे ब्रँड मध्येच आहे, असा दावा शिवसेनेचे समर्थक करीत आहेत. त्यासाठी त्यांनी चक्क ४० किलोमीटर पदयात्रा केली.
राज्यात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. याबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सावध प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. मात्र ही युती व्हावी यासाठी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
या संदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रवीण नाईक यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढण्यात आली. मनमाड येथून मनमाड येथून मोठ्या संख्येने पदाधिकारी नस्तनपुर येथील प्रख्यात शनि मंदिरात साकडे घालण्यासाठी गेले होते. या पदयात्रेत शेकडो समर्थक सहभागी झाल्याने तो चर्चेचा विषय ठरला.
यावेळी जिल्हाप्रमुख प्रवीण नाईक, सुनील पाटील, माजी नगराध्यक्ष संतोष गुप्ता, श्रावण आढाव, शैलेश सोनवणे, विनय आहेर, मायकल फर्नांडिस, गोटू केकान या पदाधिकाऱ्यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी नस्तनपुर येथे शनी देवाला ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी साकडे घातले.
विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने घोटाळा करून आपले सरकार बनवले आहे. मोठ्या संख्येने या पक्षाकडे आमदारांची संख्या असल्याने विरोधी पक्षांना कमकुवत करण्यासाठी सत्ता आणि आपल्यात शक्तीचा उपयोग ते करीत आहेत. या लोकशाही विरोधी सरकारला आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ठाकरे बंधूच पराभूत करू शकतात, असा दावा जिल्हाप्रमुख निकम यांनी केला.
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यास सामान्य जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. महाराष्ट्रातील मराठी माणूस आणि हिंदुत्व याचे रक्षण करण्याची क्षमता फक्त ठाकरे बंधू यांच्याकडेच आहे. उद्याचे सत्ताधारी हिंदुत्वाच्या नावाखाली सत्ता उपभोगत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तेतील पक्ष मोठ्या प्रमाणावर विरोधी पक्षांच्या नेत्यांना फोडण्याचे काम करीत आहेत. महायुती पुढे प्रबळ विरोधक म्हणून ठाकरे बंधू हाच उत्तम पर्याय आहे. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मनमाड येथून नस्तनपुर येथे 40 किलोमीटर पदयात्रा काढून कार्यकर्त्यांनी थेट शनि देवालाच साकडे घातले आहे. त्याला काय प्रतिसाद मिळतो याची उत्सुकता आहे.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.