

Republican Party unity : महाराष्ट्रातील रिपब्लिकन पक्षांच्या ऐक्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे प्रमुख रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत काम करण्याची तयारी दर्शवली आहे.
इतकेच नव्हे, तर प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पक्षात प्रवेश करून पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे, अशी थेट ऑफरच आठवले यांनी दिली आहे.
रामदास आठवले सध्या अहिल्यानगर (Ahilyanagar) दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी महाराष्ट्रातील रिपब्लिकन ऐक्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले एकत्र आल्याशिवाय रिपब्लिकन ऐक्य होत नाही, अशी चर्चा होत असल्याचा उल्लेख करत आठवले यांनी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची तयारी व्यक्त केली.
रामदास आठवले (Ramdas Athawale) म्हणाले, “प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले एकत्र आल्याशिवाय रिपब्लिकन ऐक्य होत नाही, असं बोललं जातं. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी आमच्या पक्षात प्रवेश करून पक्षाचे अध्यक्षपद भूषवावे. मी त्यांच्याबरोबर काम करण्यास तयार आहे.” आठवले यांच्या या विधानामुळे महाराष्ट्रातील रिपब्लिकन राजकारणात पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली आहे. विशेषतः प्रकाश आंबेडकर या प्रस्तावावर काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाला अपेक्षित राजकीय विस्तार का मिळाला नाही, यावरही रामदास आठवले यांनी भाष्य केले. महाराष्ट्रात दलित समाजाचे प्रमाण सुमारे 13 टक्के असल्याचे सांगताना आंबेडकरी बौद्ध समाजाचे प्रमाण सुमारे नऊ टक्के असल्याचा दावा त्यांनी केला. उत्तर प्रदेशातील राजकारणाचा संदर्भ देत आठवले म्हणाले की, तेथे दलित मतदारांचे प्रमाण 22 ते 23 टक्क्यांच्या आसपास असल्याने मायावतींच्या राजकारणाला त्याचा फायदा झाला. महाराष्ट्रातही रिपब्लिकन ऐक्य झाल्यास त्याचा राजकीय परिणाम होऊ शकतो, अशी भूमिका त्यांनी मांडली. रिपब्लिकन ऐक्यासाठी माझी तयारी आहे. यासाठी माझ्या पक्षाने चार वेळा पावले मागे घेतली आहेत. प्रकाश आंबेडकरांशिवाय ऐक्य केलेले आहे; मात्र तेवढा प्रतिसाद मिळाला नाही, असे आठवले यांनी सांगितले.
रिपब्लिकन ऐक्याचे यापूर्वीही प्रयत्न झाल्याची आठवण आठवले यांनी करून दिली. 1990च्या दशकात रिपब्लिकन ऐक्यासाठी प्रयत्न झाले होते. त्यावेळी समाजामध्ये मोठा उत्साह निर्माण झाला होता, असे त्यांनी सांगितले. आजही प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आमची काम करण्याची तयारी आहे. आम्ही दोघे एकत्र आलो, तर चांगले यश मिळत आहे, असे आठवले म्हणाले. प्रकाश आंबेडकर सर्व निवडणुका लढवत आहेत; मात्र त्यांच्या पक्षाला अद्याप अपेक्षित मान्यता मिळालेली नाही, असा दावाही आठवले यांनी केला. आपल्या पक्षाला 1996 मध्ये मान्यता मिळाल्याचा संदर्भ देत पक्षाला मान्यता मिळवण्यासाठी सहा टक्के मतदान आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रकाश आंबेडकर यांच्या राजकीय क्षमतेचेही रामदास आठवले यांनी कौतुक केले. प्रकाश आंबेडकर हे पक्के राजकीय नेते आहेत. तेवढा मी नाही, अशी टिप्पणी त्यांनी केली. आठवले यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील रिपब्लिकन राजकारणातील संभाव्य ऐक्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आता रामदास आठवले यांच्या या थेट प्रस्तावावर प्रकाश आंबेडकर काय भूमिका मांडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.