

सागर निकवाडे
Heena Gavit News : नंदुरबारमध्ये व्हायरल होणाऱ्या कथित ऑडिओ क्लिपचे प्रकरण आता एका नव्या वळणावर पोहोचले आहे. एका कथित ऑडिओ क्लिपमध्ये भाजपच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्याविरोधात अर्वाच्च भाषेचा वापर केल्याप्रकरणी भाजपचे माजी प्रदेश महामंत्री तथा उत्तर महाराष्ट्र समन्वयक विजय चौधरी यांच्यावर नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या १५ दिवसांपासून नंदुरबारमध्ये विजय चौधरी यांच्याशी संबंधित विविध ऑडिओ क्लिप्स व्हायरल होत आहेत. कधी अधिकारी, कधी पदाधिकारी तर कधी थेट मंत्र्यांसोबतच्या या कथित संवादांमुळे नंदुरबारच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे. या क्लिप्सच्या माध्यमातून मंत्र्यांपर्यंतचे कथित आक्षेपार्ह संभाषण समोर येत असल्याने नंदुरबारचे राजकीय व सामाजिक वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.
या सर्व प्रसारित होणाऱ्या ऑडिओ क्लिप्स 'एआय' तंत्रज्ञानाच्या मदतीने छेडछाड करून तयार करण्यात आल्याचा दावा भाजपचे माजी महामंत्री विजय चौधरी यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांच्या मुलाने नंदुरबार पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
विजय चौधरी यांच्या मंत्री जयकुमार रावल आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबतच्या कथित संवादाच्या क्लिप्सही व्हायरल झाल्या आहेत. या संभाषणांवरून भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.
या क्लिप्समधून थेट आमदार विजयकुमार गावित यांच्या कुटुंबालाच लक्ष्य करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. त्यातच डॉ. हिना गावित यांच्याबाबत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आक्षेपार्ह भाष्य करणारी एक क्लिप समोर आल्यानंतर वातावरण अधिक तापले.
या कथित व्हायरल क्लिपप्रकरणी डॉ. हिना गावित यांचे चुलत भाऊ रोहन गावित यांच्या तक्रारीवरून विजय चौधरी यांच्याविरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ तसेच इतर संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे डॉ. हिना गावित यांच्या समर्थकांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे. कार्यकर्त्यांनी विविध पोलीस ठाणी आणि तहसील कार्यालयांमध्ये जाऊन कडक कारवाईची मागणी केली आहे. तसेच विजय चौधरी यांची भाजपामधून हकालपट्टी करण्यात यावी, अशी थेट मागणी पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आली आहे.