Ahmednagar Politics : राजकारणात जर-तरला महत्त्व नसते, पण जसे गणेश कारखान्याच्या निवडणुकीत माझी गाडी अडवून सभासदांनी मला गणेशच्या निवडणुकीत ओढले. त्यामुळे भविष्यात सहकारी जसे आवाहन करतील, तसा निर्णय घेऊ. शेवटी जो पक्ष शेतकऱ्यांचे हित पाहील तोच आमचा पक्ष असेल, असे वक्तव्य भाजपचे युवानेते आणि संजीवनी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केल्याने आता विविध चर्चांना सुरुवात झाली आहे.
विखेंच्या राहाता तालुक्यात असणाऱ्या मात्र विधानसभा निवडणुकीला कोपरगाव मतदारसंघाला जोडलेल्या मोठ्या लोकसंख्येच्या ग्रामपंचायती कोल्हे गटाने विखेंच्या ताब्यातून काढून घेतल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नव लोकनियुक्त सरपंच आणि सदस्यांचा सत्कार कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना विवेक कोल्हेंनी केलेल्या काहीशा कोड्यातील वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
माध्यमांशी बोलताना कोल्हे यांनी एकूणच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर दहशत करणे, खोट्या केसेस करणे, कामे अडवणे, विकासाऐवजी सतत राजकारण करत राहणे, असे गंभीर आरोप नाव न घेता केले. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही याच पद्धतीचे आरोप संगमनेर बाबत विखेंना उद्देशून केलेले आहेत. आता त्यानंतर कोल्हेंनी याचीच री ओढल्याने गणेश निवडणुकीतील थोरात-कोल्हे युती आगामी काळातही राहणार अशीच चिन्ह आहेत.
सध्या जायकवाडीला नगर जिल्ह्यातील धरणांतून द्यायच्या पाण्यावरूनही विवेक कोल्हे यांनी राधाकृष्ण विखे यांचे नाव न घेता टोला लगावला. मी सध्या अनेक नेत्यांशी बोलत आहे. अनेकांशी बोलणार आहे, असे कोल्हे यांनी सांगत वर्षानुवर्षे ज्यांच्याकडे लाल दिवे आहेत, त्यांच्यावर जनता जायकवाडी पाणी प्रश्नावर खापर फोडल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत मंत्री विखेंवर नेमका बाण मारला.
एकंदरीत विखेंवरील केलेली टीका आणि बाळासाहेब थोरात यांच्याशी वाढलेली जवळीक यामुळे आगामी विधानसभा तुम्ही राधाकृष्ण विखे यांच्या विरोधात लढवणार, अशी चर्चा असल्याबाबत थेट प्रश्न पत्रकारांनी विवेक कोल्हे यांना या वेळी विचारला. यावर बोलताना अजून निवडणुकांना 365 दिवस निवडणुकीला बाकी आहेत. नाव चर्चेत असणे, इच्छुक असणे आणि पक्ष श्रेष्ठींनी सूचना करणे वेगळे असते असे सांगत वेळ आल्यावर पाहू असे सूचक उत्तर दिले.
त्याचबरोबर मी म्हणजे काही नाही. शेवटी माझ्यावर विश्वास ठेवणारे अनेकजण आहेत. त्यामुळे पक्ष देईन ती जबाबदारी आणि शेतकऱ्यांचे हित पाहिल तोच आमचा पक्ष असेल असे सांगितले. तसेच यालाच जोडून गणेश कारखान्याच्या वेळी सभासदांनी माझी गाडी अडवून मला निवडणुकीत इच्छा नसताना उतरवले होते. त्यामुळे मी नव्हे तर आम्ही म्हणून त्यावेळी निर्णय घ्यावा लागेल. सहकारी जसे आवाहन करतील तसा निर्णय होईल, असे सांगत विवेक कोल्हे यांनी विरोधकांना गर्भित इशारा दिल्याचे बोलले जातेय.
शिर्डीतून विखेंच्या विरोधात निवडणूक लढवणार का? याबाबत विवेक कोल्हे यांनी आज जरी थेट आणि स्पष्ट उत्तर दिले नसले तरी "सहकारी म्हणतील तसे" या अर्थाने वक्तव्य करत आणि त्याला गणेश कारखाण्याच्या निवडणुकीचा संदर्भ देत केलेले अधांतरी वक्तव्य येणाऱ्या काळातील राहाता-कोपरगाव तालुक्यातील राजकारण एका वेगळ्या वळणावर जाऊ शकते, असे संकेत निश्चितच मानले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.