मंत्री महोदय आदित्य ठाकरे, आपले नाशिकमध्ये स्वागत!

जनमानस म्हणते नाशिककरांना हवा विकास आणि पर्यावरणही...
Envirnment Minister Aditya Thakre
Envirnment Minister Aditya ThakreSarkarnama
Published on
Updated on

डॉ. राहुल रनाळकर

नाशिक : शहरीकरणाचा (Nashik) वेग पाहता, शहरांमध्ये सोयी-सुविधांचीही प्रचंड गरज निर्माण होत आहे. शहरातील मूलभूत सोयी-सुविधांवर प्रचंड ताण येत आहे. मात्र विकास साधत असताना पर्यावरणाकडे (Envirnment) दुर्लक्ष होऊ नये, याची खबरदारी नाशिकमधील प्रशासनाला आणि नागरिकांना घ्यावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thakre) आज शहरात येत आहेत. त्यांच्या या दौऱ्याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

Envirnment Minister Aditya Thakre
धक्कादायक...आदित्य ठाकरेंच्या कारवाईनंतर हरकतींचा पाऊस

राज्याचे पर्यावरण मंत्री आणि तरुणांचे लाडके नेतृत्व असलेले आदित्य ठाकरे नाशिकमधील उड्डाणपूल आणि झाडांच्या संदर्भातील आढावा घेण्यासाठी येत आहेत. नाशिककर त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत. काही मुद्दे आदित्य यांच्यासमोर मांडण्यासाठी केलेला हा प्रपंच. आदित्यजी, पर्यावरणातील आपला दांडगा अभ्यास आहे. राज्यातील विकासाची धोरणे ठरविताना पर्यावरणाचे प्रश्न अग्रक्रमाने समोर येत आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ न देता शहरांचा विकास साधण्याचे समतोल कौशल्य महाविकास आघाडी सरकारला साधावे लागणार आहे. नाशिककरांनाही आपल्याकडून हेच अपेक्षित आहे.

Envirnment Minister Aditya Thakre
Collector : सरकारी नोकरीत सामावून घ्या, म्हणत त्याने जिल्हाधिकाऱ्यांनाच दिली धमकी..

नाशिकसारख्या मेट्रोकडे वाटचाल करणाऱ्या विकसनशील शहराचा प्रचंड विस्तार होत आहे. विकास आणि पर्यावरण या दोघांचा समन्वय साधत नाशिकला पुढे जावं लागणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. नैसर्गिक संपत्तीची विपुल संपदा नाशिकला लाभली आहे. त्यामुळे या जैवविविधतेचे जतन, संवर्धन होण्याची गरज आहे. कुठलेही रस्ते रुंदीकरण असो अथवा पूल झाडांच्या छाटणीचा, पुनर्रोपणाचा किंवा तोडणीचा विषय त्यात येणार हे स्वाभाविक आहे. आता विकास साधताना किती झाडं हा वाचवता येऊ शकतात, यात खरं कौशल्य आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जी झाडं तोडली जातील, त्याच्या बदल्यात लावण्यात येणारी झाडे कशारीतीने लावली जातील, याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.

त्रिमूर्ती चौक ते सिटी सेंट्रल मॉल आणि सिटी सेंट्रल मॉल ते मायको सर्कल असे दोन उड्डाणपूल नाशिक शहरात प्रस्तावित आहेत. नगररचना करताना किंवा वाहतुकीच्या संदर्भात विचार करताना पुढील १५-२० वर्षांचं व्हीजन डोळ्यासमोर ठेवून नगररचना अभियंते आराखडे आखत असतात. मुंबईच्या वाहतूक समस्येचा विचार करता जर नितीन गडकरी यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना ५५ उड्डाणपूल निर्माण केले नसते, तर आजच्या मुंबईचा विचार करणंही अवघड झालं असतं. ठाण्यात पोहोचल्यानंतर मंत्रालयापर्यंत जाण्यासाठी उड्डाणपूल नसते तर किमान चार तास आज लागले असते. नितीन गडकरी महोदयांना त्यामुळेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘रोडकरी’ ही उपाधी बहाल केली होती. उड्डाणपुलांशिवाय आजच्या मुंबईची कल्पना केवळ अशक्य आहे. त्यामुळे १५-२० वर्षांनंतर वाढणाऱ्या नाशिकचा विचार करून नगर नियोजनाचा विचार होणं गरजेचं आहे.

उड्डाणपुलाभोवती फिरणाऱ्या राजकारणाशी सामान्य माणसाला काही देणेघेणे नाही. नाशिककरांना इथलं पर्यावरणही जपायचं आहे आणि विकास देखील साधायचा आहे. राहता राहिला प्रश्न सिमेंटच्या प्रतवारीचा. याबाबत ४० वरून ६० केलेली प्रतवारी हा तज्ज्ञांच्या समितीने घेतलेला निर्णय आहे. उड्डाणपुलाच्या खांबांची जाडी कमी करायची झाल्यास आणि वृक्षतोड कमी होऊ द्यायची असेल तर अधिक प्रतवारीचे सिमेंट वापरणे गरजेचे आहे, त्याशिवाय त्याला मजबुती मिळू शकत नाही, त्यामुळे या संदर्भात उच्च न्यायालयात होणाऱ्या युक्तिवादांकडे बारकाईने पाहावे लागेल.

त्रिमूर्ती ते सिटी सेंट्रल मॉल या उड्डाणपुलासाठी ९४ झाडांपैकी ३० झाडे कटिंगमध्ये येत असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यात म्हसोबा महाराज मंदिरालगतचे वटवृक्ष येत नाही. त्यामुळे दोनशे वर्षे जुन्या या वटवृक्षाला काहीही धोका नाही. पैकी ७ झाडांचे पुनर्रोपण शक्य आहे. १३ झाडांचे पुनर्रोपण शक्य होणार नाही, त्याबदल्यात त्याच वयोगटातील झाडे लावण्यात येणार आहेत. सिटी सेंट्रल मॉल ते मायको सर्कल या उड्डाणपुलासाठी बाधित होणाऱ्या झाडांचं सर्वेक्षण सुरु आहे. हे दोन्ही उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर सिडको आणि परिसरातील वाहतूकधारक नागरिक अवघ्या चार ते पाच मिनिटांत त्रिमूर्ती चौकातून त्र्यंबक रोडवरील महापालिकेच्या जलतरण तलावासमोर उतरू शकतील. नाशिकचं नाशिकपण जपतं या शहरानं विकासाच्या उंच भराऱ्या घ्याव्यात, यासाठी नाशिककर कमालीचे आसुसलेले आहेत...

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com