Sinnar ZP Election: सिन्नर तालुक्याला प्रदीर्घ काळानंतर माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून मंत्रिपद मिळाले आहे. मात्र राज्यातील राजकीय स्थिती आणि बेसुमार पक्ष त्यांची स्वतःच्याच मतदारसंघात अडचण करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघातील जातीय समीकरणे कोणत्या वळणावर जातात, याची सगळ्यांना उत्सुकता आहे.
सिन्नर विधानसभा मतदारसंघात सात जिल्हा परिषद गटांचा समावेश आहे. सिन्नरचे सहा आणि इगतपुरीचा खेड हा गट येतो. माणिकराव कोकाटे मंत्री असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) पक्षाला जिल्हा परिषदेत किमान त्यांच्या मतदारसंघात तरी मोठे यश अपेक्षित आहे. त्यासाठी कोकाटे यांना तन आणि मन यापेक्षाही पहिल्यांदाच बरीच काही तोशीष सहन करावी लागणार आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणूक सिन्नर मतदारसंघाचा एक नवा पॅटर्न म्हणून पाहिला जातो. लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाजे यांना या मतदारसंघातून जवळपास एक लाख साठ हजार मते मिळाली होती. सर्वच पक्ष आणि नेते खासदार वाजे यांच्या पाठीशी उभे राहिल्याचे दिसून आले.
त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत माणिकराव कोकाटे यांना तेवढी अनुकूल स्थिती नव्हती. निवडणुकीत विजय संपादन करण्यासाठी कोकाटे यांना बरीच धावपळ करावी लागली होती. त्यानंतर देखील प्रतिस्पर्धी उमेदवार उदय सांगळे यांनी ९७ हजार मते घेतली. या राजकीय स्थितीत अद्याप फारसा फरक पडलेला नाही.
सिन्नर विधानसभा मतदारसंघातील जातीय समीकरणे माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या विजयाला कारणीभूत ठरत आली आहेत. मात्र हीच समीकरणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मंत्री कोकाटे यांच्या मार्गातील अडचण ठरणार आहे. दापुर (चास) आणि नायगाव या दोन जिल्हा परिषद गटांमध्ये उदय सांगळे यांना आजच निर्विवाद वर्चस्व दिसते आहे. या गटांमध्ये कोकाटे यांच्या मंत्रिपदाची परीक्षा असेल.
नांदूर शिंगोटे गटामध्ये कोकाटे यांना मोठ्या मतांची आघाडी नव्हती. त्यामुळे या गटात देखील श्री. सांगळे आणि मंत्री कोकाटे यांच्या समर्थकांत अटीतटीची स्पर्धा असेल. त्यात मंत्री कोकाटे यांना भरपूर परिश्रम घ्यावे लागणार आहेत. येथे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या बाजूने किती मतदार असतील हे देखील निकालातून दिसेल.
मंत्री कोकाटे यांचे होम पीच असलेल्या मुसळगाव आणि देवपूर या गटात अटीतटीची लढत असेल. त्यांना यंदा देवपूर गटातून आपली कन्या सीमांतिनी कोकाटे (देवपूर) यांना निवडून आणायचे आहे.
मुसळगाव गटात वाजे यांचे समर्थक कोकाटे यांची निवडणूक कशी अवघड होईल, यासाठी मेहनत घेतील. ठाणगाव गटात आरक्षण काय पडते, यावर राजकीय गणित ठरेल. खासदार वाजे यांचे समर्थक नामदेव शिंदे यांचे वर्चस्व असलेला हा गट आहे. त्यामुळे या गटात खासदार वाजे यांच्या नेतृत्वाची ही परीक्षा होईल.
मंत्री कोकाटे यांच्या मतदारसंघात सात जिल्हा परिषद गट आहे. यातील किती गटांत ते बाजी मारतात यावर त्यांचे राजकीय कौशल्य अवलंबून आहे. त्यांना खासदार राजाभाऊ वाजे यांच्याबरोबरच सध्या भाजपच्या (BJP) वाटेवर असल्याची चर्चा असलेले उदय सांगळे हे देखील आव्हान देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मंत्री कोकाटे यांची राजकीय परीक्षा होणार हे मात्र नक्की.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.