नाशिक : (Nashik) जिल्ह्यातील बाजार समित्यांची निवडणुकांची (APMC) रणधुमाळी सुरू झाली असून सोमवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली आहे. बाजार समित्यावरील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, (Ajit Pawar) राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) या आठवड्यात जिल्हा दौऱ्यावर येत आहे. यात, त्यात महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) घेणार की स्वतंत्र बळ आजमावणार याची उत्सुकता आहे. (Will NCp keep our domination on APMC or take Mahavikas Aghadi parties along with)
जिल्ह्यातील १४ बाजार समितीच्या निवडणुकांसाठी दोन टप्प्यात मतदान प्रक्रिया राबविली जात आहे. पहिल्या टप्प्यात २८ एप्रिलला नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, नाशिक, घोटी, येवला, मालेगाव, चांदवड, देवळा, कळवण, सुरगाणा, दिंडोरी, सिन्नर, नांदगाव या बाजार समित्यांसाठी मतदान होईल. दुसऱ्या टप्प्यात लासलगाव, मनमाड बाजार समितीसाठी ३० एप्रिलला मतदान होणार आहे.
यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या नाशिक बाजार समितीत माजी खासदार देवीदास पिंगळे तर, पिंपळगाव बसवंतमध्ये आमदार दिलीप बनकर, सिन्नरला आमदार अॅड. माणिकराव कोकाटे, दिंडोरी श्रीराम शेटे, कळवण बाजार समिती धनंजय पवार आणि आमदार नितीन पवार, येवला माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातील येवला बाजार समितीही राष्ट्रवादीकडे आहे. घोटी बाजार समिती गोरख बोडके, अॅड. संदीप गुळवे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीची सत्ता आहे.
येवल्यात शिवसेना राष्ट्रवादीचा विरोधक आहे. अशीच स्थिती निफाड, दिंडोरी, सिन्नर, मालेगाव आदी ठिकाणी आहे. या तालुक्यांत सध्या आगामी विधानसभा निवडणुकीचे चित्र डोळ्यापुढे ठेऊन नेते व पक्षांची राजकीय विभागणी झाली आहे. एकप्रकारे हीच स्थिती बहुतांश ठिकाणी आहे. त्यामुळे तेथे महाविकास आघाडीचा पॅनेल कसा करायचा हा मोठा प्रश्न आहे. त्यात नेते आणि समर्थक दोघांतील राजकीय मतभेद टोकाचे आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादीचे नेते आघाडीला बरोबर घेणार की स्वबळावर लढतील याची उत्सुकता आहे.
गतवेळी राज्यात भाजप-शिवसेना युतीची सत्ता होती. यातही राष्ट्रवादीने ताकद लावत, बाजार समित्या ताब्यात ठेवल्या होत्या. मात्र, २०१९ विधानसभा निवडणुकीनंतर, राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहे. अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना महाविकास आघाडीचे सरकार होते.
विरोधी पक्षनेते अजित पवार गुरुवारी (ता.३०) नाशिक दौऱ्यावर येत असून, सिन्नरमध्ये त्यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा होत आहे. याशिवाय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आजपासून दोन दिवसीय दौऱ्यावर येत आहे. त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. याशिवाय या दौऱ्यात, काही प्रमुख गाठीभेटी होऊ शकतात. बाजार समितीच्या निवडणुकीची चर्चा होऊन, मोर्चेबांधणी या दौऱ्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दौऱ्याकडे राष्ट्रवादीचे लक्ष लागले आहे.
असे बदल, अशी ही नवी जुळवणी
राज्यात सत्तांतर होऊन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना व भाजपचे सरकार सत्तेवर आले आहे. या बदलत्या राजकीय समीकरणांचे पडसाद नाशिक जिल्ह्याच्या राजकारणावर देखील उमटले आहेत. पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे शिंदे गटात सहभागी झालेले आहे. बाजार समितीच्या रिंगणात उतरण्याची शिंदे गटाने जोरदार तयारी केली आहे. नाशिक बाजार समितीत तर, खासदार गोडसे व भाजप पॅनल उतरविण्याची तर घोषणाच केली आहे. पिंपळगाव बसवंत बाजार समितीतही आमदार बनकर यांच्यापुढे माजी आमदार अनिल कदम, गोकुळ गीते यांनी आवाहन देण्याच्या तयारीत आहे. कळवण बाजार समितीतही जिल्हा परिषदेचे माजी सभापती रवींद्र देवरे यांनी पॅनल उतरविण्याची घोषणा केली आहे. लासलगाव बाजार समितीतही जयदत्त होळकर, नानासाहेब पाटील यांना शह देण्याची माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, डी. के. जगताप यांनी पॅनल करण्याची तयारी केलेली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.