

VCK party News: तमिळ वैत्री कळघम अर्थात टीव्हीके पक्षाचे नेते, अभिनेता थलपती सी जोसेफ विजय यांच्या अकल्पनीय अशा राजकीय यशाची चर्चा सर्वदूर होत आहे. या चर्चेबरोबरच तमिळनाडू विधानसभेत इतर अनेक इंटरेस्टिंग गोष्टी पुढे येत आहेत. महाराष्ट्रात १९७० च्या दशकात दलित पँथर या तरुणांच्या संघटनेचे देशभरातील सामाजिक विषमतेविरोधातील लढाईत अग्रक्रमाने नाव घेतले जाते.
याच संघटनेची प्रेरणा घेऊन तमिळनाडूत राजकारण करणाऱ्या वैदुतलै चिरुतैगल कच्ची अर्थात व्हीसीके या पक्षाने नुकत्याच झालेल्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत दोन आमदार निवडून आणले आहेत. तर दोन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत या पक्षाचे दोन खासदारही निवडून आले आहेत. देशातील व महाराष्ट्रातील दलित राजकारणाला सातत्याने अपयश पचवावे लागत असताना तमिळनाडूत या पक्षाने स्थानिक मुख्य पक्षांबरोबर आघाडी करत हे यश प्राप्त केले आहे. हे अधिक महत्त्वाचे आहे.
तमिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम व पुदुच्चेरी या पाच राज्यांत येत्या काही दिवसांत नवी सरकारे सत्तारुढ होतील. पश्चिम बंगाल व तमिळनाडूत अनेक राजकीय घडामोडी वेगाने घडताहेत. तमिळनाडूत १९६७ ला द्रविड मुनेत्र कळघमचे (डीएमके) सी एन अण्णादुराई हे पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री बनले. त्यावेळेपासून नुकत्याच झालेल्या (२०२६) च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत डीएमके व त्यातूनच जन्माला आलेल्या व एम जी रामचंद्रन यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय अण्णा द्रमुक (एआयएडीएमके) या पक्षांनीच आलटून पालटून विजय मिळवला आहे. दोन्ही द्रविडी पक्षांच्या राजकीय लढाईत भाजप व काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना फारसे स्थान नसते.
फारतर कॉग्रेस पक्षाचा सुरुवातीपासून तिथे पाया आहे व हा पक्ष धर्मनिरपेक्षता या मुद्द्यावर डीएमकेशी युती करत असतो. त्यामुळे त्यांना थोडे तरी स्थान मिळत असते. मात्र भाजपला असा पाया या राज्यात कधीच लाभलेला नाही. त्याची कारणे द्रविड व ब्राह्मणविरोधी चळवळीत लपली आहेत. अशा परिस्थितीत काही स्थानिक जाती जमातींच्या प्रेरणा घेऊन जन्माला आलेल्या पक्षांनी मात्र इथे कायम आपले अस्तित्व दाखवून दिले आहे.
कदाचित तमिळनाडूत जी सामाजिक क्रांती व पेरणी झाली तिचेच ते यश असावे. आपण इथे चर्चा करत आहोत ती उपेक्षित असणाऱ्या समाजाचा कैवार घेऊन राजकारण करणाऱ्या एका पक्षाचे व त्याची नाळ महाराष्ट्राशी जोडली गेली असल्याने महत्वाची आहे. तमिळनाडूत व्हीसीके असा पक्ष महाराष्ट्रातील दलित पँथरचा वारसा सांगत चांगले यश संपादन करत आहे. या पक्षाचे पूर्वीचे नाव दलित पँथर इयाक्कम.
१९७० च्या दशकात महाराष्ट्रात दलित पँथरचा उदय झाला. या दलित पँथरची प्रेरणा अमेरिकेतील मार्टिन ल्यूथर किंग यांचा ब्लॅक पँथर अर्थात निग्रो चळवळ ही होती. महाराष्ट्रातील राजा ढाले, नामदेव ढसाळ व ज वि पवार यांच्यासोबत कार्य करुन याच दलित पॅंथरच्या फुटीतून तमिळनाडूत एम मलालचामी व डी अमुकुराज यांनी १९८२ ला हा पक्ष स्थापन केला. जातीय विषमता नष्ट व्हावी, समाजातील उपेक्षित घटकांचा सामाजिक व आर्थिक उद्धार व्हावा ही दलित पँथरची प्रेरणाच या पक्षानेही स्वीकारली.
सामाजिक न्याय, आंबेडकरवाद, मार्क्सवाद, धर्मनिरपेक्षता, तमिळ राष्ट्रवाद, द्रविडवाद ही या पक्षाची विचारधारा आहे. या पक्षाचे सध्याचे निवडणूक चिन्ह भांडे व झेंडा निळा लाल पट्टा व चांदणी असे आहे. १९८९ ला संस्थापक मलालचामी यांच्या निधनानंतर या पक्षाचे नेतृत्व थिरुमावलवन यांच्याकडे आले. त्यानंतर १९९० च्या दशकात जातीय हिंसाचार व त्याविरोधातील लढाईनंतर या पक्षाला लोकमान्यता मिळू लागली.
१९९९ ला या पक्षाने पहिल्यांदाच निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश केला. पुढे या पक्षाने टोकाची तमिळ राष्ट्रवादाची व जगभरातील तमिळ नागरिकांच्या रक्षणाची भुमिका स्वीकारली. श्रीलंकेतील तमिळ चळवळीला पाठिंबा देत महिंदा राजपक्षे यांच्या सरकारवर तमिळ नागरिकांच्या हत्येबाबत गुन्हे नोंदविण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. या पक्षाने २०२४ च्या निवडणुकीत द्रमुकच्या आघाडीत सहभागी होऊन तब्बल दोन खासदार व नुकत्याच (२०२६) झालेल्या विधानसभा निवडणुकीत दोन आमदार निवडून आणले आहेत.
पक्षाध्यक्ष थोल थिरुमावलवन हे चिदंबरम तर पक्षाचे सरचिटणीस डी रविकुमार हे विलापुरम या राखीव मतदारसंघातून निवडून आले आहेत. तर आता झालेल्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाने टिंडीवनम व कट्टुमनारकोईल हे दोन मतदारसंघ जिंकले आहेत. हिंदुराष्ट्रवादाला विरोध व कट्टर आंबेडकरवाद मानणाऱ्या या पक्षाचे यश महाराष्ट्रातील दलित राजकारणाला धडा देणारे आहे. हा पक्ष कॉग्रेस व द्रमुकच्या इंडिया आघाडीत सहभागी असतो. आता तमिळनाडूतील नव्या राजकीय समीकरणात हा पक्ष टीव्हीके सोबत जाण्याच्या तयारीत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.