Akola News : ''भाजप सध्या देशामध्ये दहशतीचे राज्य चालवित आहे. जाती-धर्मामध्ये फूट पाडत लोकांना घाबरविले जात आहे आणि दुसरीकडे नेत्यांना ‘ईडी’ची भीती दाखवत राजकीय शिडी चढली जात आहे.'' अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोल्यात बुधवारी (ता. २५) आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ''देशातील व राज्यातील नेत्यांची परिस्थिती अशी झाली आहे की, त्यांना रस्त्यावरून फिरायचे असेल तर ‘मोदी.. मोदी..’ म्हणावे लागते, अन्यथा ईडीची पिडा त्यांच्या मागे लागते. या सर्व नेत्यांनी व त्यांच्या मुलांनी रग्गड कमाई करून ठेवली आहे. ही कमाई आणि आपली मुलं जेलमध्ये जाऊ नये याची भीती या नेत्यांना आहे.'', असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
याशिवाय ''प्रस्थापित नेत्यांना मुस्लिम, दलित, आदिवासी, बहुजन समाजाला लढवत ठेवायचे आहे. त्यामुळे जाती-धर्माच्या आगीत तेल टाकण्याचे काम ते करीत आहेत. त्यांना अनेक नेते साथ देत आहेत. काहींना साखर कारखाने वाचवायचे आहेत, काहींना मालमत्ता वाचवायची आहे, काहींना स्वत:च्या मुलांना वाचवायचे आहे. परंतु या सर्वांत सच्चा कार्यकर्ता भरडला जातोय,'' असं प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली. ''अजित पवारांचा घोटाळा कोट्यवधींचा आहे. एखाद्याने दहा रुपये जरी चोरले तरी पोलिस त्याला कोठडीत डांबतात. परंतु एवढी मोठी चोरी करणाऱ्याला आज पोलिस सलाम ठोकत आहेत,'' अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
याचबरोबर ''निवडणुकीचा काळ जवळ आला, की नोटा बदलण्याचा सपाटा लावला जातो. अलीकडेच दोन हजारची गुलाबी नोट बंद करण्यात आली. आता पाचशे रुपयांचीही नोट बंद करण्याचे षडयंत्र सुरू आहे. लोकांनी आताच सावध व्हावे, अन्यथा तासन् तास रांगेत घालवावे लागतील,'' असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयावर लगावला.
तर ''लवकरच काही राज्यांमध्ये निवडणूक होणार आहे. देशात फूट पाडणाऱ्यांची उलट गिनती सुरू झाली आहे. निवडणुकीचे निकाल आल्यानंतर सारं काही स्पष्ट होईल. आपली राजकीय पोळी शेकण्यासाठी राजकारण्यांनी महाराष्ट्रात जातीपातीला आपसांत लढविणे सुरू केले आहे. आरक्षणाच्या नावाखाली समाजांना आपसांत लढविण्यात येत आहे. एकमेकाच्या ताटातील वाटा एकमेकांना देण्यावरून समाजबांधव आमने-सामने उभे ठाकले आहेत.'', अशी टीकाही आंबेडकर यांनी केली.
आघाडीत नका घेऊ, पण हे करा -
प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यातून ‘इंडिया’ आघाडीच्या देशभरातील नेत्यांना दोन आवाहन केले. वंचित बहुजन आघाडीला ‘इंडिया’मध्ये सामावून घेतले नाही तरी चालेल; पण इंधनाचे दर कमी करणे आणि देशातील प्रसारमाध्यमांना मोदींच्या गुलामगिरीतून सोडविण्याचे काम सत्ता आल्यानंतर नक्की करा.'', असे त्यांनी नमूद केले.
(Edited By - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.